मुंबईत दिवसभरात 714 कोरोना रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-new

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 714 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 594 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 361 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 107 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 72 हजार 468वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 361 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 8 हजार 292 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 23 लाख 41 हजार 22 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 722 वर पोहोचली आहे.

रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 4 हजार 913 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.62 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 537 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.57 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 26 लाख 72 हजार 269 चाचण्या झाल्या असून 19 लाख 28 हजार 603 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 80 हजार 682 जण होम कोरेंटाईन असून 3 हजार 127 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.