मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत 24 दिवसांत 11 दिवसांची वाढ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना चांगलाच नियंत्रणात आला असून गेल्या 24 दिवसांत रुग्ण दुपटीच्या कालावधीत तब्बल 11 दिवसांची वाढ झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 76 टक्क्यांवरून 81 टक्क्यांवर गेले आहे.

मुंबईत मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर पालिकेसह राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोना आता आटोक्यात आला आहे. मुंबईत दररोज सुमारे एक हजार रुग्ण आढळत असले तरी यातील सुमारे 80 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे असत नाहीत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

अशी झाली सुधारणा

  • 31 जुलैला रुग्ण दुपटीचा कालावधी 76 दिवसांवर पोहोचला होता. तर यात वाढ होऊन 24 ऑगस्ट रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी आता 87 दिवसांवर पोहोचला आहे. तर 31 जुलैला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्के होते, मात्र आता रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 81 टक्क्यांवर पोहोचला आहे.
  • तर 24 दिवसांत चाचण्यांचे प्रमाण दोन लाखांनी वाढले असून 31 जुलैपर्यंत 5 लाख 26 हजार 982 चाचण्या करण्यात आल्या होत्या. यात वाढ होऊन 24 ऑगस्टपर्यंत 7 लाख 9 हजार 583 चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.