
कोरोनाच्या प्रादुर्भावात ऑनलाइन अभ्यासातून परीक्षेची तयारी करणाऱया बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा परीक्षा अर्ज भरताना असंख्य अडचणींचा सामान करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने वर्षभर ज्या विषयांचा अभ्यास केला ते विषयच परीक्षा अर्जातून गायब झाले आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना अभ्यास न केलेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे.
अकरावी, बारावीच्या अभ्याक्रमातून अनेक विषय रद्द करण्यात आले आहेत. यंदा बारावीचा अभ्यासक्रम बदलल्याने परीक्षेला कोणते विषय निवडता येतील यासंदर्भात गेल्या वर्षी 8 ऑगस्टला विषय निश्चितीसाठी अध्यादेश जाहीर करण्यात आला. या अध्यादेशानुसार विषय निश्चितीसाठी ‘अ’ , ‘ब’ आणि ‘क’ असे तीन गट निर्माण करून यातील कोणते विषय परीक्षेसाठी आहेत हे स्पष्ट करण्यात आले; मात्र या अध्यादेशाची माहितीच काॅलेज, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आलेली नाही. परिणामी असंख्य विद्यार्थ्यांनी अकरावी, बारावी अशी सलग दोन वर्षे अभ्यासक्रमातून वगळलेल्या विषयांचा अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे, काॅलेजमधूनही जे विषय रद्द झाले आहेत तेच विषय शिकवण्यात आले आहेत. आता वर्षभर ज्या विषयांचा अभ्यास केला तेच विषय परीक्षेसाठी घेता येत नसल्याने बारावीचे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
बोर्डाचा परीक्षा अर्ज भरताना अडचणी
परीक्षेसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचण आली असून जे विषय वर्षभर अभ्यासले तेच विषय परीक्षा अर्जातून गायब आहेत. त्यामुळे आता शेवटच्या क्षणी विद्यार्थ्यांना विषय बदलण्यास सांगितले जात आहे. शिक्षणशास्त्री, सहकार, संरक्षण शास्त्र, इंग्रजी साहित्य, टंकलेखन व लघुलेखन इत्यादी विषयांबाबत या समस्या निर्माण झाल्या आहेत. आता परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ज्या विषयांचा अभ्यासच केला नाही असे विषय परीक्षा अर्जात भरावे लागणार आहेत.
शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार
बोर्डाच्या परीक्षा अर्जात ज्या विषयांचा उल्लेख नाही त्या विषयांबाबत काय निर्णय घ्यावा हे समजत नाही. याबाबत बोर्डाकडे संपर्क साधला असता त्यांनी हा प्रश्न निर्माण झाल्याचे मान्य केले आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली असून या वर्षी विद्यार्थ्यांना जे विषय शिकवले आहेत ते घेऊन बोर्डाच्या परीक्षेला बसू द्यावे अशी मागणी केली आहे. – प्रा. मुकुंद आंधळकर, समन्वयक, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.






























































