मुंबईत सरासरी रुग्णवाढीचा वेग 33 दिवसांवर; वांद्रे, भायखळा, माटुंग्यात कोरोना प्रसाराचा वेग सर्वात कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाचे रुग्ण इतर शहरांच्या तुलनेत जास्त असले तरी आता कोरोनाची लागण होण्याचे सरासरी प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे. मुंबईत कोरोनामुळे इतरांना लागण होण्याचे सरासरी प्रमाण आता 33 दिवसांवर आले असून हे प्रमाण 2.15 टक्के इतके आहे. वांद्र्यामध्ये हे प्रमाण 69 दिवस, भायखळ्यामध्ये हे प्रमाण 61 दिवस आणि माटुंग्यात हे प्रमाण 60 दिवस इतके असून प्रसाराचा वेग सर्वात कमी आहे तर दहिसरला 15 दिवस, बोरिवलीत 18 तर मालाडमध्ये हे प्रमाण 19 दिवस इतके असून कोरोना प्रसाराचा वेग इतर विभागांच्या तुलनेत जास्त आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडून जोरदार मोहीम राबवली जात आहे. वरळी असो की, धारावी फिव्हर क्लीनिक, आयसोलेशन आणि कोरेन्टाईन व्यक्तींसाठी कोरोना सेंटर्स, घरोघरी जाऊन तपासणी, ज्येष्ठांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ते लवकर कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी पालिका, खासगी रुग्णालये आणि कोरोनासाठी पूर्णवेळ रुग्णालये कमी वेळेत उभारण्यात आली. त्याच जोडीला पालिका, खासगी शाळा, क्रीडा संकुलामध्ये आयसोलेशन आणि कोरेन्टाईन व्यवस्था करण्यात आली. मुंबईतील दाटीवाटीच्या भागांमुळे कोरोना रुग्णांची संख्या 62 हजारच्या पुढे गेली असली तरी प्रत्यक्ष ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण 27 हजारच्या आसपास आहेत तर 31 हजारपेक्षा जास्त लोक आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

एच/पूर्व विभागात सरासरी वेग 1 टक्का

मुंबईत 1 जून रोजी कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा 18 दिवसांवर होता तर 10 जून रोजी हा वेग 25 दिवसांवर आला. मात्र, आता मुंबईत सरासरी वेग हा 33 दिवसांवर आला आहे. यात वांद्रे आणि खार पूर्व भाग येणाऱ्या एच/पूर्व विभागाने आघाडी घेतली असून या भागांत रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग हा 69 दिवसांवर आला आहे तर रुग्ण वाढीचा सरासरी वेग 1 टक्का इतका आहे. भायखळा आणि माझगाव हे भाग येणाऱ्या ई विभागातही रुग्ण संख्या वाढीचा वेग हा 61 दिवसांवर आला आहे तर प्रमाण 1.1 टक्के इतके आहे. एफ/उत्तर विभागात येणाऱ्या शीव, माटुंगा आणि वडाळा विभागातही कोरोना प्रसाराचा वेग हा 60 दिवसांवर आला असून प्रमाण 1.2 टक्के इतके आहे.