पालिकेने मुंबईत तीन हजार ज्येष्ठांना कोरोनापासून वाचवले!

246

कोरोनाचा धोका दीर्घ आजार आणि ज्येष्ठांना सर्वाधिक असल्याचे सांगितले जात असले तरी पालिकेने मुंबईभरात सुरू केलेल्या पल्स ऑक्सिमीटर चेकिंगमुळे तब्बल तीन हजारांवर ज्येष्ठांचा कोरोनापासून बचाव झाला आहे. पालिकेच्या तपासणीत ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी आढळलेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठांना पालिकेच्या कोरोना हेल्थ सेंटरमध्ये तातडीने उपचार दिल्याने 2987 ज्येष्ठांचा कोरानापासून बचाव झाला आहे.

पालिका प्रशासनाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ऑक्सिजन तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी आढळल्यास तातडीने ऑक्सिजन बेडवर दाखल करून आवश्यक उपचार करणे, सहाय्यक औषधोपचार करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मल्टिव्हिटॅमिन औषधोपचार करणे असे उपाय करण्यात आले, अशी माहिती डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

यामध्ये 7 लाख 85 हजार 994 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यातील 7 लाख 83 हजार 7 ज्येष्ठांची ऑक्सिजन तपासणी करण्यात आली.

या तपासणीत आतापर्यंत तब्बल 2 हजार 987 ज्येष्ठांमध्ये ऑक्सिजन पातळी कमी असल्याचे आढळून आल्यामुळे त्यांच्यावर तातडीने आवश्यक उपचार करण्यात आले.

मुंबईत 6 लाखांवर कोरोना चाचण्या

कोरोना चाचण्यांचे दररोजचे साडेचार ते पाच हजारांचे प्रमाण आता 9 हजारांपेक्षा जास्त झाले आहे. आतापर्यंत मुंबईत 6 लाख 13 हजार 745 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आवश्यक उपाययोजना वेगाने करण्यात येत असल्यामुळे कोरोना नियंत्रणात आला असून 99 हजार 147 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या सुमारे 19 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

असे केले काम

पालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटी 79 लाख 5 हजार 765 लोकांचे घरोघरी जाऊन ऑक्सिजन लेव्हल तपासणी, क्रिनिंग, टेंपरेचर तपासणी करण्यात आली

आपली प्रतिक्रिया द्या