
एमसीए निवडणुकीचा वाद अद्यापही कायम आहे. निवडणूक अधिकाऱयांनी कोणत्या कारणास्तव याचिकाकर्त्यांच्या हरकती फेटाळल्या त्याबाबतची माहिती याचिकाकर्त्यांना देण्यात आली असून त्यानुसार याचिकाकर्त्यांनी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी हायकोर्टाकडे आज मागितली. खंडपीठाने ही परवानगी देत या याचिकेवर उद्या शुक्रवारी सुनावणी ठेवली. दरम्यान उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे निर्देश तूर्तास कायम आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून इच्छुक उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱयांकडे आपले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी 24 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱयांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर एमसीएचे जुने सदस्य श्रीपाद हळबे व अन्य काही जणांनी आक्षेप घेत आपल्या हरकती नोंदवल्या. मात्र निवडणूक अधिकाऱयांनी कोणतीही कारणे न देता त्यांच्या हरकती फेटाळून लावल्या. तसेच 24 ऑक्टोबर रोजी थेट अंतिम उमेदवार यादी जाहीर केल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली. निवडणूक अधिकाऱयांनी कोणत्या आधारावर हरकती फेटाळल्या त्याची कारणे निवडणूक अधिकाऱयांनी द्यावीत तसे आदेश न्यायालयाने निवडणूक अधिकाऱयांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, हरकती फेटाळण्यामागची कारणे एमसीएकडून देण्यात आली असून त्यानुसार याचिकेत सुधारणा करायचे आहेत. न्यायालयाने याची दखल घेत याचिकाकर्त्यांना याचिकेत बदल करण्यास परवानगी दिली व सुनावणी शुक्रवारी ठेवली.




























































