मुंबईच्या पराभवाचा चौकार, पुदुचेरीकडूनही धक्का

सईद मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाला सलग चौथ्या पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. संथा मूर्तीच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर पुदुचेरी संघानेही मुंबईला पराभवाची धूळ चारली. स्पर्धेत आतापर्यंत विजयाची पाटी कोरी असलेला मुंबईचा संघ इलिट ई गटात तळाला आहे.

मुंबईला 94 धावांवर गुंडाळल्यानंतर पुदुचेरीने 19 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 95 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. लक्ष्याचा पाठलाग करताना एस. कार्तिक (26) व कर्णधार दामोदरन रोहित (18) यांनी 45 धावांची सलामी देत पुदुचेरीला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरत असताना शेल्डॉन जॅक्सनने नाबाद 24 धावांची खेळी करीत आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचविले. मुंबईकडून शिवम दुबेने 2, तर अर्जुन तेंडुलकर व अथर्व अंकोलेकर यांनी 1-1 गडी बाद केला.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना स्टार खेळाडूंनी सजलेला मुंबईचा संघ 19 षटकांत 94 धावांत गारद झाला. त्यांच्याकडून यशस्वी जैस्वाल (15), शिवम दुबे (28) व आकाश पार्कर (20) यांनाच फक्त दुहेरी धावा करता आल्या. इतर फलंदाज केवळ हजेरीवीर ठरल्याने मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. पुदुचेरीचा वेगवान गोलंदाज संथा मूर्तीने मुंबईची आघाडीची आणि मधली फळी कापून काढली. त्याने 20 धावांच्या मोबदल्यात 5 फलंदाज बाद केले. संथाच पुदुचेरीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ए. अरविंदराजने 2, तर फाबिद अहमद, अशिथ राजीव व सागर उदेशी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

आपली प्रतिक्रिया द्या