बॅचच्या आड हेरॉईनची तस्करी; कस्टम कुरीअर सेलची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमा शुल्क विभागाच्या कुरीअर सेलने बॅचच्या आड सुरू असलेल्या ड्रग्जतस्करीचा पर्दाफाश केला आहे. कस्टम कुरीअर सेलने कारवाई करून 450 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेल्या त्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 2 कोटी 7 लाख रुपये इतकी आहे. हेरॉईन तस्करीप्रकरणी एक नायजेरियन आणि एक हिंदुस्थानी नागरिकाला कस्टम कुरीअर सेलने अटक केली असून ते दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.

विविध वस्तूच्या आड ड्रग्ज, पैसे आणि सोन्याची तस्करीचे प्रकार होऊ नये याची कस्टम कुरीअर सेल खबरदारी घेत असतात. गेल्या आठवडय़ात दक्षिण आफ्रिकेतून कस्टमच्या कुरीअर सेलमध्ये एक पार्सल आले होते. त्या पार्सलमध्ये प्लायवूडचे सॅम्पल असल्याचे भासवले होते. कस्टमच्या कुरीअर सेलच्या अधिकाऱयाने ते पार्सल उघडले. तेव्हा त्या बॉक्समध्ये अधिकाऱयांना काही बॅच दिसले. त्या बॅचची तपासणी केली असता त्याच्या आतमध्ये हेरॉईन लवपले होते.

पार्सल घेण्यासाठी आलेल्या एका हिंदुस्थानी नागरिकाला कस्टम कुरीअर सेलने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत एका नायजेरियनचे नाव आले. त्याच्या अटकेसाठी कस्टम कुरीअर सेल आणि नवी मुंबई पोलिसांनी जॉइंट ऑपरेशन हाती घेतले. नवी मुंबई येथे कारवाई करून एका नायजेरियनला अटक केली. त्या नायजेरियनच्या चौकशीत काही माहिती समोर आली आहे. आफ्रिकेमधील एकाने ते ड्रग्ज असलेले पार्सल मुंबईत पाठवले होते. ते पार्सल घेण्यासाठी हिंदुस्थानी नागरिकाने एका व्यक्तीचे बनावट आधारकार्डचा तपशील दिला होता. तर आफ्रिकेहून मुंबईत येणाऱया पार्सलसाठी नायजेरियनच्या सांगण्यावरून हिंदुस्थानी नागरिकाने काहींचे कागदपत्रे घेतली होती. ती कागदपत्रे पार्सल घेण्यासाठी वापर करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.