
चरसच्या तस्करीसाठी आलेल्या दोघांना मेघवाडी पोलिसांनी अटक केली. रणवीर चौधरी आणि गजेंद्र सिंग अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 17 लाखांचा चरस पोलिसांनी जप्त केला आहे. त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
आग्रा आणि उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेले दोघे चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मेघवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई देवेंद्र ठाकूर यांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी एका हॉटेलजवळ सापळा रचला. पोलिसांनी त्या हॉटेलमधील एका खोलीत छापा टाकला. छापा टाकून पोलिसांनी रणवीर आणि गजेंद्रला ताब्यात घेतले. ते दोघे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 3 किलो 414 ग्रॅम चरस जप्त केले. जप्त केलेल्या चरसची किंमत सुमारे 17 लाख रुपये इतकी आहे. रणवीर आणि गजेंद्रविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्या दोघांना अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. ते दोघे चरस कोणाला देणार होते याचा तपास मेघवाडी पोलीस करत आहेत.
घातक शस्त्राची तस्करी करणाऱ्याला अटक
घातक शस्त्राची तस्करी करणाऱयाला गुन्हे शाखेच्या अधिकाऱयाने अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, दोन जिवंत काडतुसे जप्त केली. शस्त्र प्रकरणी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. अंधेरी-कुर्ला रोड परिसरात काही जण घातक शस्त्रs घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱयाने सापळा रचला. सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
उपचाराच्या नावाखाली महिलेवर अत्याचार
तंत्रमंत्र आणि जादूटोणाद्वारे उपचाराच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱयाला एकाला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा अधिनियमाद्वारे त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. सांताक्रुझ येथे राहणाऱया पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नवी मुंबईत सापळा रचला. त्या आधारे त्याला कळंबोली येथून ताब्यात घेतले.