
फटाका जवळ येऊन फुटला म्हणून फटाके वाजविणाऱया तरुणांशी हुज्जत घालून दोघा भावांनी चौघांवर चाकूचे वार केल्याची घटना देवनार येथे घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी दोघा भावांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गणेश चितलवाड आणि त्याचा मित्र विशाल असे दोघे रविवारी रात्री सोनापचर रोडवरील न्यू गौतम नगर परिसरात फटाके पह्डत होते. तर तेथेच काही अंतरावर निखिल आणि नीलेश भालेराव हे दोघे भाऊ बसलेले होते. फटाके पह्डत असताना फटाक्यातला बॉम्ब हा निखिल व नीलेश यांच्याजवळ जाऊन फुटला. त्यामुळे दोघा भावांना विशालचा राग आला. निखिलने विशालसोबत बाचाबाची करायला सुरुवात केली. त्या वेळी गणेश मध्यस्ती करत बाचाबाची व त्यांच्यात होणारे भांडण सोडवण्याकरता पुढे आला. परंतु निखिल काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्यामुळे निखिल व विशाल यांचे भांडण सोडवण्याकरता त्याच परिसरात राहणारे किरण, इब्राहिम, फैसल, अविनाश आदी लोक आले. परिणामी निखिल व त्याचा भाऊ नीलेश हे दोघे शांत झाले व तेथून निघून गेले. दरम्यान, काही वेळाने दोघे पुन्हा तेथे आले. मग नीलेशने रागाच्या भरात गणेशला पकडले. निखिलने त्याच्याकडील चाकूने गणेशवर सपासप वार केले. त्यानंतर विशालवरदेखील वार केले. इतके करून ते थांबले नाहीत तर भांडण सोडविण्यासाठी आलेले किरण व फैसल यांच्यावरदेखील वार करण्यात आले.























































