नशेसाठी घरफोड्या करणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

नशा करण्यासाठी चोऱया, घरफोडय़ा करणारा वॉण्टेड सराईत गुंड आणि चरसी मुंबई गुन्हे शाखेच्या अखेर हाती लागला. हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णाच्या नातेवाईकाचे पैसे चोरून पसार झालेल्या त्या नशेबाजाला गुन्हे शाखेच्या युनीट-12 च्या पथकाने अथक परिश्रम घेऊन बेडय़ा ठोकल्या.

दिंडोशी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाचा मुलगा प्रतिक्षालयात झोपलेला असताना त्यांच्याकडील 80 हजारची रोकड, महागडा मोबाईल व काही कागदपत्र असा सक्वा लाखाचा ऐवज चोरीला गेला होता. याची गंभीर दखल घेत उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट-12 चे वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे, एपीआय विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड तसेच अमोल राणे व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. पथकाने हॉस्पिटलपासून अंधेरी रेल्वे स्थानकापर्यंत सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तेव्हा चोरटा एका रिक्षातून पळून जाताना दिसला. पोलिसांनी खबऱयांच्या मदतीने तपास सुरू केला. अखेर तो चोर अंधेरीतच सापडला. आसिफ इद्रीस पठाण (30) असे त्याचे नाव असून तो नशेबाज आहे. त्याच्या विरोधात 30 हून अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याला दोन वेळा तडीपारदेखील केले होते आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळाला होता.