
दहशतवाद्यांच्या नेहमीच निशाण्यावर असलेल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रेल्वेच्या विविध मार्गांनी वेळेत पोहचता यावे यासाठी नॅशनल प्रोटेक्शन ग्रुप अर्थात एनएसजीच्या 120 कमांडोंनी शुक्रवारी दुपारी कांजुरमार्गहून लोकल पकडत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वेळेत गाठता येते का याची रंगीत तालीम केली. यावेळी दणकट ब्लॅक कॅट कमांडोंच्या खाडखाड बुटांच्या आवाजाने स्टेशन परिसरात घबराट पसरत अनेकांना 26 नेंव्हेंबर 2008 च्या हल्ल्यांच्या आठवणी जाग्या होत त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला.
पवई येथे एनएसजी कमांडोंचा लष्करी प्रशिक्षण तळ असून त्यांनी ठाण्याहून सुटणारी लोकल कांजुरमार्ग येथून पकडली. त्यांच्यासाठी मागच्या दिशेचे तीन कोच रिकामे ठेवण्यात आले होते. पिकअवर संपल्यानंतर दु. 13.11 वाजता ठाणे लोकल पकडण्यात आली. त्यानंतर ही लोकल बरोबर सीएसएमटी पोहचली. आता कांजुरमार्ग ते चेंबूर आणि अंधेरी ते सीएसएमटी अशाही ट्रायल घेण्यात येणार आहेत.
मध्यरात्रीच्या ब्लॉकमुळे दिवसा रंगीत तालीम
26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी कमांडोंना विमानतळावरून सीएसएमटीला येण्यासाठी बेस्टच्या बसेस मदतीला पोहचल्या होत्या. परंतु रस्ते मार्गावर जर ट्रफिक असेल तर अशा बिकटप्रसंगी हेलिकॉप्टरच थेट सीएसएमटीच्या इमारतीवर उतरविण्याचीही ट्रायल एनएसजी कमांडोंना करायची असून त्यासाठी सीएसएमटी मुख्यालय आणि आजूबाजूंच्या इमारतींचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अशरफ के. के. यांनी स्पष्ट केले.





























































