गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या दादरच्या महत्त्वपूर्ण टिळक ब्रीजचा प्रश्न मार्गी लागला असून या ठिकाणी अत्याधुनिक केबलचा ब्रीज बांधण्यात येणार आहे. दादर पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱया या ब्रीजचे काम 30 महिन्यांत पूर्ण होणार असून यासाठी 375 कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे प्रमुख पूल अभियंता राजेंद्रकुमार तळकर यांनी दिली. दरम्यान, या केबल ब्रीजचे काम पूर्ण होईपर्यंत सध्याचा ब्रीज वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे.
दादर पूर्व – पश्चिमला जोडणाऱया टिळक ब्रीजचे काम करण्यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून अनेक वेळा आवाज उठवण्यात आला होता. मात्र या ब्रीजवरील रहदारीच्या प्रश्नामुळे ब्रीजचे काम करणे पालिकेला मुश्कील बनले होते. मात्र या ठिकाणी सध्याच्या ब्रीजला समांतर केबल ब्रीज बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेच्या पूल विभागाकडून घेण्यात आला आहे. या पुलाचे काम ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट काॅर्पेरेशन’ (एमआरआयडीसी)कडून केले जाणार आहे. या कामासाठी महामंडळाला पालिका आणि रेल्वे मंत्रालयाकडून निधी देण्यात येणार आहे. या पुलासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
सी-लिंकच्या धर्तीवर केबलचा ब्रीज
- प्रस्तावित टिळक ब्रीज हा वांद्रे सी-लिंकच्या धर्तीवर बांधला जाणार आहे. हा पूल साधारण 650 मीटर असून त्यापैकी केबलवर आधारित भाग सुमारे 190 मीटरपर्यंत असेल.
- या नवीन पुलाची एकूण रुंदी 17.1 मीटर इतकी असेल. मुख्य म्हणजे या पुलाची क्षमता आताच्या पुलापेक्षा दुप्पट राहणार असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
- सध्याचा पूल सुमारे 4.5 मीटर उंचीचा असून नवीन पूल हा त्यावर समांतर पद्धतीने बांधला जाणार आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढणार असली तरीही जमिनीवर उतरण्यासाठी रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे.































































