
केंद्र सरकार लादत असलेल्या विनाशकारी वाढवण बंदरला विरोध करण्यासाठी आज मुंबई, पलाघरच्या किनारपट्टीवर मच्छीमारांनी कडकडीत बंद पाळला. कुलाबा, वरळी, खारदांडा ते उत्तन, अर्नाळा, झाईपर्यंतच्या मच्छीमारांनी मासेमारीसाठी एकही बोट समुद्रात न उतरवता मासळी बाजारासह या व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवहार बंद ठेवले, तर दुसरीकडे कोळीवाडय़ांमधील भूमिपुत्र हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. प्रभातफेरी, मानवी साखळी, निदर्शने तर कुणी मुंडण करून एकच जिद्द… ‘वाढवण बंदर रद्द’चा नारा बुलंद केला. स्थानिक रिक्षा संघटना, हॉटेल, रिसॉर्टचालकांनीही पाठिंबा दिल्याने वाढवणवासीयांच्या बंदरविरोधी आंदोलनाला आणखीन बळ मिळाले.
पालघर जिह्यातील वाढवण येथील समुद्रात सुमारे 5 हजार एकर भराव टाकून जगातील सर्वात मोठे बंदर बांधण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. मात्र या बंदरामुळे भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी, बागायतदार यांना नेस्तनाबूत होणार असून पर्यावरणालाही मोठी हानी पोहचणार असल्याची भावना येथील स्थानिकांची आहे. सर्वाधिक मासळी देणारा गोल्डन बेल्टच उध्वस्त होणार असल्याने येथील मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि आंदोलनाची धार आणखीन तीव्र करण्यासाठी महाराष्ट्र मच्छीमार कुती समिती, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कर्स फोरम, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, पालघर, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्य. सह. संघ, लि., आदिवासी एकता समिती व आदिवासी कष्टकरी समितीने आज मुंबई ते डहाणूच्या झोईपर्यंत ‘कोळीवाडे बंद’ची हाक दिली होती. त्याला पालघर जिह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळालाच, पण मुंबईतील कोळीवाडय़ांनीही उत्स्फूर्त सहभाग घेऊन बंद यशस्वी केला.
मच्छीमारांच्या एकजुटीची वज्रमूठ
वाढवण बंदरला विरोध करण्यासाठी मच्छीमारांनी एकजुटीची वज्रमूठ घट्ट केली. डहाणू, तलासरीससह उत्तन व अर्नाळय़ातील मच्छीमारांनी काळे झेंडे दाखवून केंद्राच्या मनमानीचा निषेध केला. पालघर येथे महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सचिव मोरेश्वर वैती, ज्योती मेहेर, पूर्णिमा मेहेर, दर्शना पाघधरे, रेखा तरे, हर्षदा तरे, प्राची नाईक, राजन मेहेर, फिलिप मस्तान, जगदीश नाईक, पालघर जिल्हा परिषदेचे गटनेते जयंत दुबळा, ठाणे जिल्हा मच्छीमार सहकारी संघ अध्यक्ष जयकुमार भाय, गणेश तांडेल, गणेश वैभव वझे, मानवेंद्र आरेकर, धनंजय तरे, प्रशांत नाईक, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष नारायण पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत मोरे, सचिव वैभव वझे, नॅशनल फिश वर्पर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तर ठाणेमध्ये मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, वेलेरिन पांडीक, विल्यम, मुंबईमध्ये सरचिटणीस किरण कोळी, मोरेश्वर पाटील, उज्ज्वला पाटील, दिलीप पागधरे, भुनेश्वर धनू, जयेश भोईर, परशुराम मेहेर, राजेश्री भानजी, राजेश्री नाखवा आदी आंदोलनात सहभागी झाले.
- मुंबईतील ससून डॉक, भाऊचा धक्का या मोठी उलाढाल करणाऱया बंदरातील व्यापाऱयांनी स्वयंस्फूर्तीने मार्पेट बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला.
- कुलाबा, कफ परेड, वरळी, खारदांडा, जूहू मोरागांव, वर्सोवा, मढ, भाटी, मालवणी, मनोरी, गोराई हे मुंबईतील सर्व कोळीवाडे बंद आंदोलनात सहभागी झाले.
- पालघर जिह्यातील वसई पाचू बंदर, नायगाव, खोचिवडे, अर्नाळा, दातिवरे, कोरे, एडवण, उसरणी, के. दांडा, केळवा, के. दादर , के. माहीम, टेम्भी, वडराई, शिरगाव, सातपाटी, खारेपुरण, मुरबे, नवापूर, नांदगाव, आलेवाडी, दांडी, उच्छेळी, घिवली, पंबोडा, तारापूर, चिंचणी, चिंचणी दांडेपडा, वरोर, वाढवण, गुंगवडा, धाकटी डहाणू, डहाणू, नरपड, चिखला, घोलवड, बोर्डी, झाई गावात बंद करून निषेध केला.

































































