मुंबईला पुन्हा ताप; डेंग्यू चारपटीने वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाच्या तिसऱया लाटेचे संकेत मिळत असताना पावसाळी आजारांचा धोकाही कायम असून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये तब्बल चार पटींनी वाढ झाल्याने मुंबईचे टेन्शन वाढले आहे. जुलैमध्ये महिनाभरात फक्त 28 असणारी डेंग्यू रुग्णसंख्या ऑगस्टमध्ये थेट 132 वर पोहोचली आहे. शिवाय मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रो, हिपेटायटिस आणि ‘एच 1 एन 1’ची रुग्णसंख्याही कायम असल्यामुळे धोका कायम असल्याने मुंबईकरांना पावसाळी आजार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुंबईत जुलैपासूनच पावसाळी आजार वाढण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळी आजारांमध्ये जूनच्या तुलनेत जुलैमध्ये दुप्पट वाढ झाली होती. यामध्ये ऑगस्टमध्येही पावसाळी आजारांच्या रुग्णांची संख्याही कायम आहे. जुलैपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढून या आजारांचा प्रसार वाढल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास पालिका रुग्णालये किंवा नजीकच्या डॉक्टरशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. पावसाळी आजारांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, दवाखान्यांमध्ये आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांत आढळलेले रुग्ण

आजार जुलै ऑगस्ट

  • मलेरिया 787 790 लेप्टो 37 37
  • डेंग्यू 28 132
  • गॅस्ट्रो 294 276
  • हिपेटायटीस 48 35
  • एच-1 एन-1 21 17

लालबाग-परळ, सॅण्डहर्स्ट रोड, वांद्रे पश्चिमेत सर्वाधिक डेंग्यू रुग्ण

ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 132 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एफ/दक्षिण लालबाग-परळ, सॅण्डहर्स्ट रोड आणि एच/पश्चिममध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून 1315373 घरांमध्ये भेटी देऊन डेंग्यू निर्माण करणारी स्थाने असलेली 11492 ठिकाणे नष्ट करण्यात आली.

नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास पालिका रुग्णालये किंवा नजीकच्या डॉक्टरशी तातडीने संपर्क साधावा.