
शिवसेना मुंबईच्या विकासाआड कधीही आली नाही आणि येणारही नाही. मात्र विकासकामे करताना झाडे हटवावी लागली तर त्यांच्या संगोपनाची हमी द्या अशी ठाम भूमिका शुक्रवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत शिवसेनेने घेतली. यामध्ये मेट्रोसाठी तोडल्या जाणाऱया 159 झाडांच्या बदल्यात दुप्पट झाडे लावणे आणि पुनर्रोपित करण्यात येणाऱया 107 झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
वृक्ष प्राधिकरणामध्ये विविध विकासकामांसाठी झाडे तोडणे आणि पुनर्रोपित करण्याचे एकूण 12 प्रस्ताव मांडण्यात आले. यावेळी प्रशासनाने याआधी तोडलेल्या झाडांच्या बदल्यात लावलेल्या झाडांच्या सद्यस्थितीची माहिती द्यावी अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोमार्गात आतापर्यंत कापण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात किती झाडे लावली, किती पुनर्रोपित केली याची आकडेवारी सादर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आज मेट्रो कामासाठी 159 झाडे कापणे व 107 झाडे पुनर्रोपित करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
…तर कारवाई करा
विकासकामासाठी एक झाड तोडल्यास त्याच्या बदल्यात दोन झाडे लावावीत असा नियम आहे. मेट्रो कामासाठी एमएमआरसीएलच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत तसेच शेकडो झाडे पुनर्रोपितही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात किती आणि कुठे झाडे लावली आणि पुनर्रोपित केलेल्या झाडांपैकी किती झाडे जिवंत आहेत याची माहिती संबंधित आस्थापनाकडून घ्यावी, अशी मागणीही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडलेल्या झाडांच्या बदल्यात झाडे लावणे, पुनर्रोपित झाडांची निगा राखणे बंधनकारक आहे. याकडे संबंधित आस्थापनाने दुर्लक्ष केले असल्यास आवश्यक कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.





























































