
देवेंद्रजी, मी हा विचार कधी केला नव्हता की अशा विषयावर मला भाषण करावं लागेल. पण हा प्रसंग माझ्यावर तुमच्यामुळेच आलेला आहे. अर्थसंकल्प सादर होण्याआधी ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक काढत मित्र म्हणून तुम्ही माझं काम सोपं केलं आहे. अर्थसंकल्पावर पुढील पाच-दहा वर्षे असंच पुस्तक लिहीत रहा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्या. आम्हालाही कळत राहील की आमच्याकडून काय नेमक्या उणिवा राहिलेल्या आहेत. त्या उणिवा सुधारत सुधारत आम्ही पुढे जात राहू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच पुस्तक लिहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे म्हणाले, बुधवारी अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा बोलावा, वाचावा यापेक्षा अर्थसंकल्प कसा अमलात आणावा याचे उत्तम उदाहरण दिलेय. देवेंद्रजी हे पुस्तक तुम्ही लिहिलंत आणि आपणही इथे पाहुणे म्हणून आला आहात. आपला कार्यक्रमसुद्धा दुसऱयाच्या खर्चाने कसा करावा याचं उदाहरण दिलंय अशी फिरकी उद्धव ठाकरे यांनी घेताच सभागृहात एकच हशा पिकला. तुम्ही एक चांगला विषय हाताळला आहे. हे पुस्तक पहिल्याप्रथम मीच वाचणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांना ‘दिल्लीत जाण्याचा’ दिलेला सल्ला… तर ‘सगळं करून नामानिराळं कसं राहावं यावर पुस्तक लिहा’ अशी सभापती रामराजे निंबाळकर यांनी केलेली मार्मिक टिप्पणी…अशा राजकीय चिमटे आणि टोलेबाजीत ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’चा प्रकाशन सोहळा रंगला.
नोटाबंदी हा विषय अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता?
सर्वसाधारण अर्थसंकल्पात ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे अशा बारीकसारीक गोष्टींचा विषय असावा लागतो. उदबत्त्या स्वस्त होणार, पण माचिस महागणार. चामडय़ाच्या वस्तू, बॅगा महागणार, चपला स्वस्त होणार. अर्थव्यवस्थेवर परिणाम होणारी गोष्ट अर्थसंकल्पात मांडायला हवी. मग नोटाबंदी हा विषय अर्थसंकल्पात यायला हवा होता की नव्हता, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी विधासभा अध्यक्ष नाना पटोले, उपसभापती ऍड. नीलम गोऱहे, भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या खिशात भर कशी पडेल याचा विचार करतो तो यशस्वी अर्थमंत्री!
परवा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आल्या होत्या. तेव्हा अर्थमंत्री म्हणून त्या बाजूला होत्या आणि आजही अजितदादा अर्थमंत्र्यांच्या शेजारीच बसलो आहे. आमची नुकतीच मैत्री झाली आहे. यशस्वी अर्थमंत्री म्हणजे काय असतं. जेव्हा बजेट सादर केलं जातं तेव्हा लोकांना माहीत असतं की आपले खिसे कापले जाणारच. सगळे खिसे सांभाळून बसलेले असतात. अर्थसंकल्प मांडल्यानंतर लोकांना कळतच नाही की आपला कोणता खिसा कापला गेलाय. पण तसा माझा नवीन मित्र नाही. ‘ज्या जनतेच्या खिशावर आपला अर्थसंकल्प अवलंबून असतो त्या जनतेच्या खिशात भर कशी टाकावी’ याचा विचार करतो तो यशस्वी अर्थमंत्री, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
अर्थमंत्र्यांची ध्येय आणि दिशा स्पष्ट असावी लागते – अजित पवार
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अर्थमंत्री अजित पवार यांचा त्रास कमी होण्यासाठी हे पुस्तक लिहिले असल्याची टिप्पणी केली होती. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, फडणवीस यांनी योग्य वेळी योग्य पुस्तक काढले आहे. सामान्य माणसाला अर्थसंकल्प समजावा म्हणून हे पुस्तक लिहिलं आहे. अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी केवळ भाषा सोपी असून चालणार नाही तर अर्थसंकल्प सादर करणाऱया अर्थमंत्र्याची ध्येय आणि दिशा ही देखील स्पष्ट असावी लागते . एकेकाळी आपण अर्थसंकल्प मांडत असताना विरोधक गोंधळ घालत होते आणि त्यावेळी एक व्यक्ती हेडफोन घेऊन अर्थसंकल्प ऐकत होता. ते म्हणजे फडणवीस होते. त्यावेळी कदाचित गोंधळ घालणाऱया मुनगंटीवार आणि महाजनांना हे माहीत नसेल की हा बाबा मुख्यमंत्री होणार आहे असे अजित पवार म्हणताच हशा पिकला.
देवेंद्रजी दिल्लीत गेले तर 288 सदस्य मान्यता देतील; सर्वात आनंदी मुनगंटीवार होतील
देवेंद्रजींचं हे पुस्तक बघितल्यानंतर तुम्हाला एका उत्तम साहित्यिकाची जाण आहे. ही जाण बघितल्यानंतर तुम्ही राजकारण सोडून एक उत्तम लेखक होऊ शकता. आम्हालाही जरा सुगीचे दिवस येतील. राम नाईक साहेब तुम्ही इथे उपस्थित आहात तेव्हा दिल्लीला सांगितलंत की साहित्यिक पण आहेत, त्यांना बरंच ज्ञान आहे आणि त्याचा उपयोग आपण दिल्लीत करून घेऊ, तर बरं होईल. तर या सभागृहातील 288 सदस्यांची त्याला मान्यता राहील. त्यात सर्वात आनंदी कोण होईल तर सुधीर मुनगंटीवार होतील असा टोला अजित पवार यांनी लगावला.
जीडीपी, फिस्कल डिफिसीट असे काही मोठे मोठे शब्द आहेत. त्यापेक्षा सोप्या भाषेत, मी कर भरतोय ना त्या कराचा माझ्यासाठी काय उपयोग होणार आहे हे सर्वसामान्यांना अर्थसंकल्पात कळायला हवं.






























































