
कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्याही मोठय़ा प्रमाणात कमी होत आहे. धारावीनेही कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देत पॉझिटिव्ह वाटचाल कायम ठेवली असून आज दिवसभरात 3 रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्याही 1 हजारावरून 62 वर पोहोचली आहे. दरम्यान, जी-उत्तरमध्ये येणाऱया धारावी, माहीम आणि दादरमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 418 दिवसांवर पोहोचला आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे आरोग्यसेवक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गेल्या दीड वर्षापासून दिवसरात्र मेहनत घेत असून जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह विविध मोहिमा राबवत आहेत. धारावीची प्रकृती लक्षात घेऊन त्या पद्धतीने मोहीम राबवली जात असून सध्या कोरोना चाचण्यांबरोबर लसीकरणावरही भर दिला जात आहे. मुंबईत पहिल्या लाटेत दाटीवाटीच्या वस्त्या आणि झोपडपट्टय़ांच्या भागात मोठय़ा प्रमाणात पसरलेल्या कोरोनाला दुसऱया लाटेत मात्र आधीच घेत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीमुळे शिरता आले नाही.
आठवडाभराची रुग्णसंख्या
26 मे – 3
25 मे – 7
24 मे – 5
23 मे – 16
22 मे – 9
21 मे – 15
20 मे – 7
दुसरी लाट 150च्या आत
कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या मध्यानंतर वाढू लागली. एप्रिलमध्ये धारावी, दादर आणि माहीममध्ये रुग्णसंख्या 100 च्या पुढे गेल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेतही धारावीत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढेल असे वाटले होते. दिवसभराची रुग्णसंख्या 150च्या पुढे जाण्याआधीच पालिका प्रशासन, खासगी डॉक्टर्स आणि स्थानिक संस्थांच्या मदतीने मोहीम राबवल्यामुळे धारावीकर कोरोना चाचण्या व लसीकरण करण्याकडे वळले आणि कोरोनाला नियंत्रणात ठेवणे शक्य झाले.






















































