धारावीचा कित्ता माहीमने गिरवला, दिवसभरात एकही रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीने आघाडी घेतली असून फेब्रुवारी मध्यापासून सुरू झालेल्या दुसऱया लाटेदरम्यान आतापर्यंत आठ वेळा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीला लागून असलेल्या माहीमनेही आता धारावीचा कित्ता गिरवायला सुरुवात केला असून माहीममध्ये आज दिवसभरात एकही रुग्ण सापडला नाही तर धारावी आणि दादरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील सर्वात मोठी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवत असतानाच मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर आणि माहीममध्येही पालिकेच्या जी-उत्तर विभागाकडून कोरोना नियंत्रणासाठी जोरदार मोहीम राबवली गेली. मेट्रो कर्मचारी, हॉटेलमधील कामगार, फेरीवाले यांच्यासाठी कोरोना चाचण्या आणि लसीकरण मोहीम राबवण्यात आली. कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान दादर आणि माहीममध्ये रुग्णसंख्येत चढउतार होत होता, मात्र आता धारावीपाठोपाठ माहीममध्येही रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यानही माहीममध्ये दोनदा कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली होती. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यानंतर आलेल्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या पुन्हा वाढली होती.

धारावीत विशेष लसीकरणात 13,460 जणांचे लसीकरण

धारावीत सिटी बँक आणि जसलोक रुग्णालयाच्या माध्यमातून विशेष लसीकरणाची मोहीम 27 जूनपासून सुरू करण्यात आली असून यात महिनाभरात एक लाख लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 13 हजार 460 जणांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती जी-उत्तरचे आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी दिली.