
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजयी होत निर्विवाद वर्चस्व मिळविले. बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहकार पॅनेलच्या 17 जागा याआधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित चार जागांसाठी रविवारी मतदान झाले. या चारही जागांवर सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकाच्या निवडीसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मत मोजणी झाली. मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना 18 मते तर सुखदेव चौगुले यांना 16 मते मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदारसंघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठय़ा फरकाने पराभव केला.
पुरुषोत्तम दळवी यांना 131 मते तर कमलाकर नाईक यांना 59 मते मिळाली. महिला सहकारी संस्था मतदारसंघ जयश्री पांचाळ यांना 332 मते तर, शालिनी गायकवाड यांना 188 मते मिळाली. भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल 4 हजार मते मिळाली तर, यलाप्पा कुशाळकर यांना 350 मते मिळाली.
मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सहकार पॅनेलवर विश्वास टाकत 21 पैकी 21 जागा निवडून दिल्या आहेत. त्याबद्दल सर्व मुंबईकरांचे, सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे आभार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मानले.
आमदार प्रवीण दरेकर, सुनील राऊत, प्रसाद लाड बँकेच्या संचालक पदावर
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर आमदार प्रवीण दरेकर, सुनील राऊत, प्रसाद लाड, संदीप घनदाट, शिवाजीराव नलावडे, अभिषेक घोसाळकर, आनंदराव गोळे, सिद्धार्थ कांबळे, विष्णू घुमरे, नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, सोनदेव पाटील, शिल्पा सरपोतदार, कविता देशमुख, विनोद बोरसे, नितीन बनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

























































