मुंबई विभागात 26 जानेवारीपूर्वी शाळा सुरू होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विभागात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी महापालिका शिक्षण विभाग सज्ज झाला असून येत्या प्रजासत्ताक दिनापूर्वी शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याविषयीचा प्रस्ताव महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने सोमवारी आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून मंगळवारी या प्रस्तावावर निर्णय होण्याची आशा शिक्षण विभागातील अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि परिसरात कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे नवीन वर्षात मुंबईसह ठाणे, रायगड जिह्यात नववी ते बारावीपर्यतच्या शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. शिक्षण विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 15 तारखेपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज आहे. मात्र अंतिम निर्णय महापालिका आयुक्तच घेतील.

मुंबई, ठाणे, पालघर आणि काही अन्य जिल्हे वगळता इतर ठिकाणी 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यत राज्यभरातील सुमारे 10 लाखाहून अधिक विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. मुंबई परिसरात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक असल्याने या भागातील शाळा सुरू झाल्या नव्हत्या. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या भितीमुळे पालकांसह शिक्षकही शाळा सुरू करण्यास तयार नव्हते. माञ आता कोरोनाचा प्रभाव फारच कमी झाला आहे. नवीन केसेसमध्ये होत असलेली घट पाहता शाळा सुरू करण्यास तयारी दर्शविण्यात आली आहे.