अतिवृष्टीचा धोका सांगणारे दुसरे डॉप्लर रडार ऑगस्टमध्ये येणार, अंधेरीच्या वेरावलीत पायाभूत कामे सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टीचा धोका सांगणारे दुसरे डॉप्लर रडार ऑगस्टमध्ये दाखल होणार असून त्यासाठी अंधेरीच्या वेरावली इथे रडारसाठी आवश्यक असलेला पाया आणि टॉवर बांधण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच हे रडार मुंबईत येणार होते. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामुळे त्याला उशीर झाला आहे.

मुंबईत अतिवृष्टीचा फटका जीवनवाहिन्या समजल्या जाणाऱ्या रेल्वे, बेस्ट या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे नोकरदारांना आणि काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या सर्वसामान्यांना कार्यालयात, घरात पोहोचायला उशीर होतो. याबाबतची माहिती व आवश्यक मदत मुंबईकरांना तातडीने मिळावी, यासाठी हवामान खात्याकडून पालिकेच्या वेरावली येथील जागेत दुसरे सी बँड डॉप्लर रडार बसवण्यात येणार आहे. त्यामुळे हवामानाची अधिक अचूक आगाऊ माहिती मिळणे शक्य होणार आहे. सध्या कुलाबा येथे एक डॉप्लर रडार कार्यरत आहे.

‘इस्रो’च्या मार्गदर्शनाखाली काम सुरू

हिंदुस्थानची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ हे सी बँड डॉप्लर रडार बनवत आहे. चेन्नई येथील कारखान्यात ‘इस्रो’च्या मार्गदर्शनाखाली एका कंपनीकडून रडार बनवण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण देशी बनावटीचे हे रडार आहे. रडारचे काम पूर्ण झाल्यावर कंटेनरमधून सुट्या भागांच्या स्वरूपात ते मुंबईत आणले जाणार आहे. इथे जुळणी करून टॉवरवर बसवले जाणार आहे.

कोरोनामुळे उशीर

अंधेरीत रडारसाठी पाया तयार करण्याचे आणि टॉवरचे काम सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सर्व कामे उशिराने सुरू आहेत. चेन्नईच्या कारखान्यातही पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी रडारचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबईत येणारे रडार आता ऑगस्टमध्ये येणार आहे.

‘कुलाब्यात एक डॉप्लर आधीच आहे. पण अंधेरीतील डॉप्लरमुळे हवामानातील बदल अधिक लवकर समजणे शक्य होणार आहे. हे रडार 250 किलोमीटरपर्यंत पाहू शकते. त्यामुळे सुमारे ४ तास आधीच अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि हवामानातील इतर तीव्र बदल समजणे शक्य होणार आहे. याचा आगाऊ इशारा मुंबईकरांना देता येणार आहे.’ – डॉ. कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, हवामान खाते