पॅरोलच्या सुट्टीत शिकलो स्वस्त बॉम्बचे टेक्निक, डॉ. बॉम्बची धक्कादायक कबुली

1173

देशभरात बॉम्बस्फोटांची मालिका घडवणारा खतरनाक दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी ऊर्फ डॉ. बॉम्ब याने पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘पॅरोल’वर मुंबईत आल्यानंतर नवीन आणि स्वस्त टेक्निकने बॉम्ब कसा बनवायचा ते शिकत होतो अशी कबुली त्याने पोलीस चौकशीत दिल्याने खळबळ उडाली आहे.

52 बॉम्बस्फोटांची मालिका घडवून देश हादरवणारा डॉ. अन्सारी हा 21 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता, पण पॅरोलची मुदत संपत असतानाच त्याने मुंबईबाहेर पोबारा केला होता. पण महाराष्ट्र एटीएसने यूपी एसटीएफच्या मदतीने अवघ्या 24 तासांत त्याला कानपूरमध्ये पकडले. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली. त्यात आपण फक्त नवीन आणि स्वस्त टेक्निकने बॉम्ब कसा बनवायचा हे शिकत होतो, अशी कबुली डॉ. बॉम्बने दिली आहे. म्हणजेच पुन्हा बॉम्बस्फोट घडविण्याचा अन्सारीचा मनसुबा होता हे स्पष्ट होते. स्वस्त टेक्निकने बॉम्ब कसा बनवायचा हे शिकण्यासाठी अन्सारीला कोणी मदत केली, त्याच्या संपर्कात कोण होते, देशाबाहेर गेल्यानंतर त्याला नेमके काय करायचे होते याचा पोलीस आता कसून चौकशी करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दहशतवादी डॉक्टर जलीस अन्सारी ऊर्फ डॉक्टर बॉम्बला 21 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तो दरदिवशी हजेरी लावत होता. मात्र पॅरोलचा कालावधी शुक्रवारी संपत असतानाच तो गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास फरार झाला होता. शुक्रवारी कानपूरमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसने त्याच्या मुसक्या आवळल्या.

26 वर्षांनंतरही क्रूरता कायम

पारंपरिक पद्धतीने बॉम्ब बनवणाऱयांवर, त्याच्यासाठी लागणाऱया कच्चा सामग्रीवर पोलिसांची बारीक नजर असते याची कल्पना डॉक्टर बॉम्बला होती. त्यामुळेच अत्यंत सोपी, शंका येऊ नये आणि स्वस्तात अधिकाधिक जीवित आणि वित्तहानी व्हावी यासाठी नव्या पद्धतीने बॉम्ब बनवण्यासाठी तो प्रयत्न करत होता, मात्र तो काही करण्याच्या आधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीत 26 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतरही त्याची क्रूर मानसिकता कायम असल्याचा आणखी एक पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.

अनोळखी मुलाचा झाला नातेवाईक

पॅरोलवर सुटल्यानंतर तो मुंबईत घरी आला. मात्र पत्नी आणि मुलांसोबतच्या भांडणांमुळे तो वैतागला आणि त्याने घर सोडले, अशी माहिती त्याने पोलीस तपासात दिली. कानपूरमध्ये पोहोचल्यानंतर त्याला मित्रांकडून आश्रय मिळाला नाही. त्यामुळे एका मशिदीत सामान ठेवून शहर फिरला, मात्र नंतर त्याने लखनौमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कानपूरला स्टेशनमध्ये शिरताना त्याने एका लहान मुलाबरोबर आणि त्याच्या वडिलांबरोबर ओळख केली. तो त्यांचा नातेवाईकच असल्याप्रमाणे मुलाचा हात पकडून स्टेशनमध्ये शिरला आणि लखनौमध्ये जाणाऱया ट्रेनची चौकशी केली. मात्र चौकशी करून मागे वळताच एटीएसच्या अधिकाऱयांनी त्याला हातकडय़ा घातल्या.

आधी असा करायचा बॉम्बस्फोट

देशभरात कुठेही जातीय दंगल किंवा पोलीस गोळीबारात मुस्लिम मारला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले की, डॉ. जलीसचे पित्त खवळायचे. तो पेटून उठायचा. मग त्याने आपल्याकडील विज्ञानाचा व ज्ञानाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. दहशतवादी टूण्टाकडून बॉम्ब बनवायचे धडे घेतल्यानंतर डॉ. अन्सारी सल्फरेटेड हायड्रोक्लोरिक ऑसिड व एक्स्पोझिव्ह पावडर या गंधकांच्या सहाय्याने प्रुड बॉम्ब बनवून तो स्फोट घडवू लागला. एखाद्या छोटय़ा डब्यात तळाला स्फोटकांची पावडर ठेवायची. त्याच्यामध्ये रेल्वेचे तिकिट व त्यावरती सल्फरेटेड ऑसिड ठेवायचे. ऑसिडचे थेंब गळून ज्यावेळी रेल्वे तिकिट पूर्णपणे भिजून ते स्फोटकांच्या पावडरवर पडायचे त्यावेळी स्फोट होऊन हानी व्हायची. अशाप्रकारे 31 डिसेंबर 1989 रोजी गिरगाव चौपाटीवर पहिला बॉम्बस्फोट घडवून आणला होता. पण अन्सारी आता बॉम्ब बनवायची नवीन टेक्निक शिकत होता, हे गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या