
मुंबईची पावसाळ्यापूर्वीची दरवर्षी केली जाणारी 80 टक्के नालेसफाई 31 मेपर्यंत झाली पाहिजे, असा दम मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिका अभियंते आणि कंत्राटदारांना दिला होता. मात्र, डेडलाईनला दीड महिना शिल्लक असताना पंत्राटदारांनी आतापर्यंत केवळ 12 टक्के नालेसफाई केली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी 80 टक्के नालेसफाई कधी आणि कशी होणार, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.
मुंबईत पावसाळ्यापूर्वी 80 टक्के, पावसाळयात 10 टक्के आणि पावसाळा संपल्यावर 10 टक्के अशा तीन टप्प्यात छोटे आणि मोठया नाल्यातील गाळ काढण्यात येतो. मुंबई महापालिकेने 23 कंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी नदी व इतर नदी पात्रातील गाळ काढण्याची कंत्राटी कामे दिली आहेत. त्यासाठी पालिका तब्बल 395 कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा अथवा गैरप्रकार होऊ नये यासाठी पालिकेने कडक अटी – शर्ती आणि नियम लागू केले आहेत. कंत्राटदारांना नालेसफाई काम सुरू करण्यापूर्वी आणि नालेसफाई कामानंतर फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, संबंधित अभियंत्यांना कामाच्या ठिकाणी हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱयांची कामावर कडक देखरेख असतानाही नालेसफाईची कामे मात्र अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत.
…तर कंत्राटदारांवर कारवाई
नालेनिहाय पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणाच्या 100 मीटरमध्ये जे लहान, मोठे नाले आहेत ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ होत आहेत की नाही, याचीही पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱयांकडून खात्री करण्यात येते. ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी पंप बसवले आहेत. हे पंप पावसाळय़ात बंद पडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाते. काही मोबाईल पंप तैनात ठेवण्यात आले आहेत. मात्र, एखाद्या ठिकाणच्या पंपामध्ये ऐनवेळी बिघाड झाला, तर त्या ठिकाणी मोबाईल पंपाद्वारे पाणीउपसा सुरू ठेवता येणार आहे. पंपामध्ये सातत्याने बिघाड झाला तर पंप पुरवणाऱया पंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला आहे.