मुंबईत 75 टक्के नालेसफाई पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगात सुरू असून आतापर्यंत नालेसफाईचे एकूण 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज दिली. यामध्ये पूर्व उपनगरात 70 टक्के, पश्चिम उपनगरात 63 टक्के, तर शहर विभागात 40 टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून मिठी नदीमधील 90 गाळ काढण्यात आला आहे.

मुंबईत दरवर्षी मार्चच्या मध्यावर सुरू होणारे नालेसफाईचे काम यावर्षी उशिरा सुरू झाले. 7 मार्च रोजी पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्याने नालेसफाईचे प्रस्ताव मंजुरीसाठी रखडले होते. मात्र प्रशासक आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नालेसफाईच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याने नालेसफाई यावर्षी 11 एप्रिलला सुरू झाली. यावेळी पालिकेने 15 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यवाहीचे आदेश कंत्राटदारांना दिले होते. यावर्षीच्या नालेसफाईत आयुक्तांच्या निर्देशानुसार तीन शिफ्टमध्ये काम करण्यात येत आहे. नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी सर्व सातही परिमंडळात भरारी पथक ठेवण्यात आले आहे. गाळाच्या वजनानुसारच कंत्राटदारांना मोबदला दिला जातो.

कामचुकार कंत्राटदाराला हटवले

मुंबईत नालेसफाई पूर्ण करण्याचे 15 मेचे टार्गेट असताना शहर विभागात आतापर्यंत केवळ 40 टक्के नालेसफाई झाली आहे. त्यामुळे संबंधित कामचुकार कंत्राटदाराला वगळून दुसरा कंत्राटदार नेमण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. केलरासू यांनी दिली.

संबंधित कामचुकार कंत्राटदाराकडून टार्गेटच्या 50 टक्के नालेसफाई करून घेण्यात येणार असून प्रत्येक दिवशी दंडवसुली करण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल.

कामाच्या दिरंगाईबाबत नोटीस दिलेल्या कंत्राटदाराने उत्तर देताना आपल्याला वाहतूक व्यवस्था वेळेत उपलब्ध झाली नसल्याने कामाला वेळ लागत असल्याचे सांगत काम पूर्ण करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता.

असे झाले काम

संपूर्ण मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले, पावसाळी गटारे आणि मिठी नदीमधून 907160.96 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील 669412.86 मेट्रिक टन गाळ आतापर्यंत काढण्यात आला आहे.
मुंबईकरांना आपापाल्या विभागातील नालेसफाईची माहिती मिळण्यासाठी पहिल्यांदाच ‘डॅशबोर्ड’ ट्रकिंग सिस्टीमही सुरू करण्यात आली आहे.
पालिकेच्या वेबसाईटवरील ऍपमध्ये आपला वॉर्ड, नाल्याचे नाव टाकल्यास कामाची टक्केवारी फोटोसह समोर येते. समाधानकारक काम नसल्यास तक्रारही करता येत आहे.

मुंबईतील नदी, नाले
मुंबईत एकूण नद्या  – 5
एकूण छोटे नाले (लांबी 605 किमी)  – 1508
एकूण मोठे नाले (लांबी 290 किमी) – 309
रस्त्याखालील ड्रेन – किमी 3134