उच्चदाब वीजवाहिन्यांना गळतीची लागण, महिनाभरात 154 कोटींची वीज वाया गेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील उच्चदाब वीजवाहिन्यांना वीज‘गळती’ची लागण झाली आहे. विजेची मागणी वाढलेली असतानाच मार्चमध्ये तब्बल 154 कोटी 80 लाख रुपये किंमतीची वीज वाया गेल्याचे समोर आले आहे. वीज निर्मिती पेंद्रामध्ये तयार झालेली वीज उच्चदाब वीजवाहिन्यांच्या माध्यमातून वितरण कंपन्यांच्या उपपेंद्रांपर्यंत वाहून आणली जाते. विजेचे वहन करत असताना वर्षभरापासून सरासरी 2.80 टक्के एवढी वीजगळती होत होती. मात्र मार्चमध्ये वीजगळतीत 3.26 टक्के एवढी मोठी वाढ झाली असून 516 दशलक्ष युनिटस् वाया गेले आहेत.

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये तयार होणारी वीज महापारेषण उच्चदाब वीजवाहिन्यांच्या माध्यमातून वितरण कंपन्यांच्या उपकेंद्रांपर्यंत वाहून आणली जाते. त्यासाठी महापारेषणच्या राज्यभरात 48 हजार सर्किट किलोमीटरच्या वीजवाहिन्या आहेत, तर 681 उच्च क्षमतेची वीजकेंद्रे आहेत. वर्षभरात उच्चदाब वीज वाहिन्यांच्या माध्यमातून वीज वाहून नेत असताना महिन्याला 2.70 ते 2.90 टक्के एवढी म्हणजे 300 दशलक्ष युनिटस्पर्यंत वीजगळती होत होती. तर फेब्रुवारीमध्ये 3.08 टक्के, मार्चमध्ये 3.26 टक्के एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीजगळती झाली आहे. म्हणजे वीज केंद्रातून 15 हजार 846 दशलक्ष युनिट वीज उच्चदाब वीज वाहिन्यांमध्ये टाकलेली असतानाही वितरण कंपन्यांपर्यंत केवळ 15 हजार 330 दशलक्ष युनिटस् वीज पोहचली असून 516 दशलक्ष युनिटस्ची गळती झाली आहे. वीज निर्मिती केंद्रांकडून खरेदी केल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेचा सरासरी दर 3 रुपये असल्याने महिनाभरात 154 कोटी रुपयांची वीज वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेवटी सामान्य ग्राहकांवरच भार

वीजवाहिन्यांमधून वीज वाहून नेत असताना विजेच्या होणाऱया गळतीचा भुर्दंड पारेषण कंपनीबरोबरच वितरण कंपनीला बसत आहे. मात्र हा सर्व भार शेवटी वीज दरवाढीच्या माध्यमातून सामान्य वीज ग्राहकांवर पडणार आहे. तीन टक्क्यांपर्यंत वीजगळती असेल तर 80-90 कोटी रुपयांचा भार पडतो. मार्चमध्ये तो 154 कोटींवर गेला आहे.