कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडय़ात अवकाळी पाऊस; गारांचा मारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाला शनिवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात अनेक ठिकाणी गारांसह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसाने नागरिकांना हायसे वाटले असले तरी निवडणूक प्रचारात अचानक घातलेल्या धिंगाण्यामुळे उमेदवारांच्या छातीत मात्र धस्स झाले आहे. पुढील दोन दिवसांत मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रात गारांसह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिल्याने दुसऱया टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा बोऱया वाजणार आहे.

हवामानात अचानक बदल झाला आहे. पूर्वेकडून वेगाने येणारे वारे आणि पश्चिमेकडून येणारे वारे समोरासमोर आल्याने दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे हवेतील बाष्प गोठवण्याची पातळी खाली आली आहे. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे शनिवारी पुणे, कोल्हापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाडय़ाच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील धामणी-गोळवली परिसरात गारांची बरसात झाली.
हीच परिस्थिती पुढील आणखी दोन दिवस राहणार असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गारांचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यात मराठवाडय़ामध्ये बीड, नांदेड, धाराशीव, लातूर, हिंगोली, परभणी येथे 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे येथे सध्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार जोरात सुरू आहे. पण आता हवामान खात्याने गारांच्या पावसाचा इशारा दिल्याने प्रचार करताना उमेदवारांची तारांबळ उडणार आहे.

आंबा, काजू, कोकम पिके धोक्यात

या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, कोकम पिके धोक्यात आली आहेत. यावर्षी हापूसचे उत्पादन आधीच कमी आहे. गेले दोन दिवस वाढलेल्या उष्णतेने झाडावरील कैरी गळून पडू लागली होती. त्यातच आज झालेल्या पावसामुळे बागायतदारांचे टेन्शन आणखीनच वाढले आहे.

मुंबईतही पावसाचा शिडकावा

राज्यात गारांसह पावसाच्या सरी कोसळलेल्या असतानाच सायंकाळी मुंबईतही पावसाने हजेरी लावली. परळ, करी रोड, चिंचपोकळी, ताडदेव परिसरात पावसाने शिडकावा केला. अचानक झालेल्या या शिडकाव्यामुळे परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. या पावसामुळे तात्पुरते हायसे वाटले असले तरी उकाडा आणखीनच वाढण्याची भीतीही मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.