सोशल मीडियावरील इंजिनीयरिंगची वेळापत्रके बनावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) शाखेच्या विविध परीक्षा सुरू असून त्याची वेळापत्रके सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. परंतु ती वेळापत्रके बनावट असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

इंजिनीयरिंगच्या प्रथम वर्ष सत्र 2 आणि द्वितीय वर्ष संगणक शाखा सत्र 4 च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहेत. ती वेळापत्रके खरी आहेत का अशी चौकशी विद्यार्थ्यांकडून सतत केली जात आहे. विद्यापीठाने ती वेळापत्रके बनावट असून खरी वेळापत्रके विद्यापीठाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली आहेत.

प्रथम वर्ष सत्र 2 ची परीक्षा 9 मेपासून सुरू झाली असून ती 7 जूनपर्यंत चालणार आहे. बनावट वेळापत्रकामध्ये 31 मे रोजी होणारा कम्युनिकेशन स्किल्स या विषयाचा पेपर 29 मे रोजी, 7 जून रोजी होणारा इंजिनीयरिंग ड्रॉइंग हा पेपर 31 मे रोजी, 29 मे रोजी होणारा ऑपरेटिंग सिस्टमचा पेपर 27 मे रोजी दाखवण्यात आला आहे. तसेच हे वेळापत्रक 22 मे रोजी प्रसिद्ध झाल्याची तारीख आहे. विद्यापीठाचे अधिकृत वेळापत्रक 14 मार्च रोजीच प्रसिद्ध झाले असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.