मुंबईकर, शाळकऱ्यांचा रोपलावणीस हातभार; ‘कोरोना’ कृपेने आजरा तालुक्यात रोपलावण अंतिम टप्प्यात

422

दरवर्षी ऐन रोपलावणीच्या हंगामात मजूर उपलब्धतेचा प्रश्न गंभीर असतो. पण यावर्षी समाधानकारक पाऊस आणि सर्वच शेतीच्या कामासाठी कोरोनाच्या कृपेमुळे पुणे, मुंबईकरांसारखे शहरवासीय गावातच आहेत. तसेच अद्यापही सुरू न झालेल्या शाळांमुळे बच्चेकंपनीही शिवार कार्यशाळेत मग्न आहेत. यामुळे मजूर न मिळण्याचा प्रश्नच निकालात निघाला आहे. म्हणूनच यावर्षीचा रोपलावण आणि इतर मशागतीच्या कामांचा हंगाम तुलनेत लवकरच अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आजरा तालुक्यात ठळक झाले आहे.

गेले आठ-दहा दिवस आजरा तालुक्यात दमदार पाऊस बरसतो आहे. जून महिन्यात 800 मिमीपेक्षा जास्त पाऊस बऱ्याच वर्षांनी झाला आहे. पावसाच्या समाधानकारक हजेरीने तालुक्यातील विशेषतः हिरण्यकेशी व चित्री नद्या दुथडी वाहात आहेत. काही मार्गही त्यामुळे पाण्याखाली गेले होते. एकूणच चांगल्या पर्जन्यमानामुळे पाण्याच्या उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर रोपलावणीला गती मिळाली असल्याने रोपलावण अंतिम टप्प्यात आली आहे, तर काही ठिकाणची लावण पूर्णत्वासही गेली आहे. रोपलावण अंतिम टप्प्यात आल्यामुळे शेतकरीवर्ग कमालीचा खुश झाल्याचे चित्र सध्या अधोरेखित झाले आहे.

बऱ्याच वर्षांनंतर रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही समाधानकारक बरसले आहे. त्यामुळे तालुक्याच्या सर्वच विभागात शेतीच्या कामांना आणि विशेषतः भाताबरोबरच नाचणीच्या रोपलावणीला वेग आला आहे. तालुक्याच्या उत्तुर विभागात रोहिणीच्या पेऱ्यातील धुळवाफेच्या पेरण्यांची उगवण चांगली झाली आहे. तर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आंबोली घाटालगतच्या अतिपावसाच्या विभागात घनसाळसारख्या बारीक भातासारख्या वाणांचे आणि नाचणीचे तरवे चांगलेच तरारुन आले. मृग नक्षत्र संपत असतानाच थोडी ओढ दिलेला पाऊस गेले आठ-दहा दिवस चांगलाच कोसळत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी रोपलावणीला लवकरच सुरूवात केली. आता पावसाने थोडी उसंत घेतल्याने आणि शेतीवाडीत पाणी साचून असल्याने अंतिम टप्प्यातील रोपलावण वेगवान झाल्याचे चित्र सध्या ठळकपणे दिसते आहे.

खवैय्यांची पहिली पसंती आणि तालुक्याची खासियत असलेल्या घनसाळ बरोबरच काळा जिरगा, इंद्रायणी, दप्तरी, शुभांगी, कोमल सारख्या प्रस्थापित भातवाणांसह काही सुधारित वाणांची व नाचणीची लावण तालुक्यात प्रामुख्याने होत आहे. अशा मजूर माणसे उपलब्ध होण्याच्या संकटावर कोरोनामुळे मात करणे शक्य झाले आहे. कोरोनाची भीती, शहरांकडे लवकर न परतण्याचा शहरवासियांचा निर्धार आणि शासनाच्या आंतरजिल्हा प्रवासासाठीच्या प्रतिबंधात्मक धोरणामुळे पुणे-मुंबईहून गावाकडे आलेला चाकरमानी सध्या कधी नव्हे तो मोठ्या संख्येने शेतीकामात जुंपला गेला आहे. तालुक्यात अशा शहरवासीयांची संख्या वीस-बावीस हजार आहे. तसेच कोरोनामुळेच अद्याप शाळांनाही सुरवात झालेली नसल्याने विद्यार्थीवर्गही शेतीच्या कार्यशाळेत रुजू झाला आहे. त्यामुळे दमदार पावसाच्या पार्श्वभूमीवर एकूणच शेती, आंतरमशागत आणि अंतिम टप्प्यातील रोपलावणीचे चित्र सुखावह बनले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या