
आगीची वर्दी मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक कॉर्डमध्ये जवान आणि अत्याधुनिक साधनसामग्री असणारी ‘फायर फायटिंग व्हॅन’ तैनात ठेवण्यात येणार आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह यांच्या मंजुरीनंतर याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे आगीसारख्या दुर्घटनेत तातडीच्या प्रतिसादामुळे जीवित-वित्तहानी टाळण्यास मदत होणार असल्याची माहिती पालिकेचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी दिली.
पालिकेच्या अग्निमशन दलाची जबाबदारी नुकतीच स्विकारल्यानंतर शशिकांत काळे यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत वेगाने कार्यवाही करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामध्ये सर्क 35 फायर स्टेशन आणि 17 मिनी फायर स्टेशनला भेट देऊन आढावा घेतला जात आहे. अग्निशमन दलात सध्या 2664 कर्मचारी-अधिकारी-जवान काम करीत आहेत. यामध्ये रिक्त असणारी सुमारे 150 ते 200 पदे तातडीने भरण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सहआयुक्त रमेश पवार यांच्यासह समित्यांची मंजुरी, लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनानंतर रिक्त पदे भरणे, कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्याचे काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले. यामध्ये फायरमन, जवान, ड्रायव्हर, असिसस्टंट फायर ऑफिसर अशी पदे भरण्यात येणार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी थ्री-लेयर सूटसारख्या अत्याधुनिक उपाययोजना करण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस उद्योगधंदे आणि लोकसंख्या वाढणाऱ्या मुंबईसाठी पालिकेच्या फायर डिपार्टमेंटचे ‘रीऑर्गनायझेशन’ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये आगीसारख्या दुर्घटनेत तातडीने बचावकार्य करण्यासाठी प्रत्येक कॉर्डमध्ये एक अत्याधुनिक सुविधायुक्त वाहन ठेवल्यास बचावकार्य वेगाने सुरू होईल. यानंतर काही वेळातच संपूर्ण यंत्रणा दाखल होईपर्यंत दुर्घटनेची वाढणारी तीक्रता कमी होऊन जीवित-वित्तहानी होण्याचे प्रमाण कमी होणार असल्याचेही काळे म्हणाले.
फायर स्टेशनची संख्या 50 पर्यंत वाढवणार
मुंबईत सध्या पालिकेची 35 फायर स्टेशन्स आणि 17 मिनी फायर स्टेशन्स आहेत. मुंबईची वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि विस्तार पाहता ही संख्या 50 पर्यंत वाढवण्याचा निर्णय एका सर्वेक्षणानंतर घेण्यात आला आहे. यानुसार कार्यवाही सुरू आहे. यामध्ये कांदिवली ठाकूर व्हिलेज, जुहू तारा रोड, सांताक्रुझ पश्चिम, एलबीएस मार्ग कांजूर मार्ग पश्चिम या ठिकाणी फायर स्टेशन तर रमाबाई आंबेडकर मार्ग घाटकोपर पश्चिम आणि जुहू तारा रोड सांताक्रुझ पश्चिम या ठिकाणी दोन मिनी फायर स्टेशन उभारण्यासाठी जागाही निश्चित झाल्याची माहिती अग्निशमन दल प्रशासनाकडून देण्यात आली.























































