शाळा, आस्थापनांमध्ये‘ध्वजारोहण’ करण्याचे आदेश अखेर मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

26 नोव्हेंबरला ‘संविधान दिवस’ साजरा करण्यासंबंधी राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकावरून गोंधळ निर्माण झाला. सुरुवातीला शाळा आणि सरकारी आस्थापनांत ध्वजारोहण करून त्याचे फोटो काढण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र दुपारनंतर हे आदेश मागे घेतले. मागील काही वर्षांनंतर शाळांमध्ये संविधान दिवस साजरा करण्यात येतो. मात्र यापूर्वी कधीही ध्वजारोहण करण्याचे आदेश दिले नव्हते, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 22 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयामध्ये 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या एक वर्षाच्या कालावधीत संविधान दिन साजरा करण्याचे म्हटले आहे. या अध्यादेशात उद्या 26 नोव्हेंबरला शिक्षण संस्थांसह अन्य आस्थापनांत ध्वजारोहण करण्यासंबंधी उल्लेख नाही. असे असताना विविध जिह्यांचे शिक्षणाधिकारी, उपसचिव यांनी यासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकात मात्र ध्वजारोहण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

…म्हणून संभ्रम वाढला

संविधान दिनी ध्वजारोहण करण्यास हरकत नाही, पण या सूचना राज्यातील सर्व शिक्षण संस्था आणि कार्यालयांत पोहोचणे आवश्यक होते, असे शिक्षण क्रांतीचे मनोज पाटील यांनी सांगितले. राज्यात एका शिक्षण संस्थेत ध्वजारोहण साजरे होणार तर दुसरीकडे होणार नाही हा संविधान दिनाचा अपमानच आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.