मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण पूर्ण करा!

मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण जून अखेरपर्यंत पूर्ण करा. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या, ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. मुंबईतील पादचारी मार्गांचे वॉर्डनिहाय सौंदर्यीकरण केले जात आहे. त्यासाठी 24 वॉर्डमधील 149 पादचारी मार्गांची निवड करण्यात आली आहे. यातील 90 टक्के मार्गांचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या मार्गांचे कशाप्रकारे सौदर्यीकरण केले जात आहे याचे सादरीकरण आयुक्त चहल यांनी केले.

मुंबईत सुमारे 344 उड्डाणपुल असून त्यापैकी सौंदर्यीकरणासाठी 42 पुलांची निवड करण्यात आली आहे तर प्रत्येक वॉर्डातील पाच याप्रमाणे 120 वाहतूक बेटांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वरळी सी फेस येथे बसविण्यात आलेल्या आधुनिक वाहतूक सिग्नल अन्यत्र देखील लावावेत अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केली.

62 रस्त्यांवर फूडहब, 22 हजार शौचकूप, 8600 प्रसाधनगृहे

मुंबईत स्ट्रीट फुड हब करण्यात येत असून त्यासाठी 62 रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रसाधनगृहातील शौचकुपांची संख्या वाढविण्यात येणार असून नव्याने 22 हजार 774 शौचकूप बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी 20 हजार 301 शौचकुपांचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 8637 नवीन प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होणार

महानगरातील 386 ठिकाणी पावसाचे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होते. त्यातील 171 ठिकाणांचे काम पूर्ण झाले असून 120 ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे एकूण 291 ठिकाणांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. मुंबई शहरात पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरातील मंडया, उद्याने, रस्ते यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या