
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची खरी ओळख ’गिरण्यांचे गाव’ अर्थात ’गिरणगाव’ अशी होती. गिरणी कामगारांचे ठळक वैशिष्टय़ आजही येथील चाळसंस्पृतीत दडलेले आहे. गेल्या काही वर्षात गिरणगावाचा चेहरामोहराच बदलला आहे. आडवी मुंबई उभी झाली अन् गिरण्यांची जागा टोलेजंग टॉवर आणि मॉल्सने घेतली. 1854 मध्ये स्थापन झालेल्या पहिल्या गिरणीपासूनच्या पुढच्या काळात हे ’गाव’ कस वसत गेलं तो सारा इतिहास लवकरच ’एक होतं गिरणगांव’ या माहितीपटातून उलगडणार आहे.
मुंबईत पहिली गिरणी सुरू झाल्यानंतर हळूहळू येथील गिरण्यांची संख्या वाढत गेली. रोजीरोटीसाठी पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह देशाच्या विविध भागातून माणसं आली. येताना आपल्यासोबत आपली भाषा, परंपरा, संस्पृती आणि सण त्यांनी आणले. या सगळ्यांचे सुंदर मिश्रण गिरणगावात तयार झाले. म्हणून गिरणगाव ही वेगळी संस्पृती म्हणून ओळखली जाऊ लागली. मुख्य रंगभूमीला समांतर अशा कामगार रंगभूमीचा जन्मही गिरणगावातलाच. सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी गिरगावच्या केशवजी नाईक चाळीत सुरू केला तरी खऱया अर्थाने हा उत्सव गिरणगावात बहरला. बदलत्या गिरणगावची ही गोष्ट लेखक-दिग्दर्शक अशोक राणे या दीड तासाच्या माहितीपटातून मांडणार आहेत.
आतापर्यंत 15 दिवसांचे शूटिंग झाले असून पुढील महिन्यात आणखी दहा दिवसांचे शूट होणार आहे. त्यानंतर ग्राफिक्स, ऑनिमेशनवर काम केले जाईल. माझा हा आठवा माहितीपट आहे. – अशोक राणे, दिग्दर्शक
हरवलेला आनंद शोधण्याचा प्रयत्न
गिरण्या बंद पडल्यानंतर गिरणगांव हळूहळू ओसाड होऊ लागले.गिरण्या का बंद पडल्या किंवा गिरणी कामगारांच्या संपावर आम्हाला कुठलेच भाष्य करायचे नाही. परंतु गुण्यागोविंदाने नांदण्याचा तो काळ आता हरवलाय. त्यावेळी गरिबी हा सगळय़ांना पकडून ठेवणारा धागा होता. गरिबीतही आनंद कसा निर्माण करायचा हे गिरणगावाने आपल्याला शिकवले. हाच हरवलेला आनंद आम्ही माहितीपटातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे मुंबई शहर अभ्यासक नितीन साळुंखे यांनी सांगितले.
1982 पूर्वीचा काळ उभारणार
या माहितीपटासाठी 1982च्या पूर्वीचे गिरणगाव उभे केले जाणार आहे. त्यासाठी मुलाखती, जुने फोटो-व्हिडिओची मदत घेतली जाणार आहे. तो काळ जिवंत करण्यासाठी रोजच्या जीवनाशी निगडीत वस्तू उदा. जुना रेडिओ सेट, दुधाचे व्रेट किंवा पाण्याचा बंब अशा कुठल्याही गोष्टी कुणाकडे असतील तर नितीन साळुंखे यांच्याशी 9321811091 या क्रमांकावर संपर्क साधावा.


























































