
सामना ऑनलाईन, खेड
मुंबई गोवा महामार्गावर टप्प्याटप्प्याने रुंदीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर कशेडी ते परशुराम घाटादरम्यान तयार आलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला पहिल्याच पावसाच तडे गेल्याचे आणि खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. आपले काम हे दर्जेदार असते असे या कंत्राटदाराने दावा करत स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. मात्र पावसाने या कंत्राटदाराने केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे उघड केले आहे.
कशेडी ते परशुराम घाटादरम्यान रस्ते बांधणीचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या या कंपनीने आपले काम अतिशय दर्जेदार असल्याचा दावा केला होता. मोरवंडे ते बोरजदरम्यान बांधण्यात आलेला रस्त्याला पाऊस सुरू होताच या ठिकठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी खड्डेही पडल्याचे सांगण्यात येत असून ते डांबर टाकून बुजवण्यात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. रस्त्याच्या या अवस्थेमुळे जनतेला कंत्राटदाराचे काम किती दर्जेदार आहे ते व्यवस्थित कळाले आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून काम पूर्ण होवून रस्ता शासनाकडे वर्ग होईपर्यंत जुन्या महामार्गाची दुरुस्ती ठेकेदार कंपनीनेच करायची आहे . तसे निविदेमध्ये नमूदही आहे . मात्र ही कंपनी हे मानायला तयार नसल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या वर्षी पावसाळा संपल्यानंतर खडड्यात गेलेल्या जुन्या महामार्गाची या कंपनीने दुरूस्ती केली नाही यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला वेगळे टेंडर काढून दुसऱ्या ठेकेदाराकडून काम करून घ्यावे लागले होते.




























































