मुंबई-गोवा महामार्गाच्या तकलादू कामाची शिवसेनेने केली पोलखोल, भोळ्याभाबड्या चाकरमान्यांना का फसवता?

मुंबई-गोवा महामार्गाच्या तकलादू कामाची शिवसेनेने आज पोल खोल केली. खारपाडा ते आमटेम या 30 किमी मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून अनेक ठिकाणी भेगांमुळे रस्ताही फाटला आहे. नव्याकोऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची दैना उडाल्याने अपघाताची शक्यता आहे. मात्र कंत्राटदाराच्या या प्रतापाकडे बांधकाम खाते कानाडोळा करत असल्याने शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत निकृष्ट कारभाराचा पंचनामाच केला आहे. भगदाड पडलेल्या या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करतानाच कंत्राटदारावर कारवाईचा रोडरोलर फिरवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही शिवसेनेने
सरकारला दिला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मागील 15 वर्षांपासून लटकले आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही रायगड जिल्ह्यात पनवेल ते पोलादपूर या दरम्यान नव्याकोऱ्या रस्त्याची दैना उडाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत व भेगा गेल्या आहेत. यामुळे खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात होण्याचीही शक्यता आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्वप्रमुख प्रसाद भोईर व तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज या रस्त्याच्या कामाची पोल खोल केली. खारपाडा ते आमटेम या सुमारे 30 किलोमीटर महामार्गाची शिवसैनिकांनी तपासणी करून पोलखोल केली.

सर्व्हिस रोडचे कामही सुमार

पोलखोल दौऱ्यात रायगड जिल्हा महिला संघटक दीपश्री पोटफोडे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, महिला उपजिल्हाप्रमुख दर्शना जवके, माजी तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, तालुका समन्वयक भगवान पाटील, उपजिल्हा युवाधिकारी नीलेश म्हात्रे, शहरप्रमुख सुहास पाटील, युवासेना अधिकारी योगेश पाटील, सरपंच नीता घरत, महेंद्र घरत, विभागप्रमुख दीपक पाटील, वसंत म्हात्रे, नंदू मोकल, कांचन थळे, राजू पाटील, गुरुनाथ पाटील, वैशाली गुरव, भारती गावंड, महानंदा तांडेल, समीर साटी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. या दौऱ्यात मुख्य रस्त्याबरोबरच सर्व्हिस रोडचे कामदेखील सुमार पद्धतीने केल्याचे लक्षात आले. पाण्याचा निचरा होण्याकरिता गटारांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे खारपाडा परिसरातील घरांमध्ये पाणी घुसत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी दौऱ्याची नौटंकी करून खड्डे भरण्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र कंत्राटदाराच्या मयुरीमुळे गणेशभक्तांना अनेक विघ्न पार करून गाव गाठावे लागते. हा महामार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण मिळाले आहे.
प्रसाद भोईर, जिल्हा संपर्कप्रमुख रायगड

महामार्गाच्या कामाचा दर्जा हा अतिशय सुमार असल्याचे सत्य पाहायला मिळाले. आपल्या मर्जीतील ठेकेदारांना ठेका देऊन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामुळेच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
समीर म्हात्रे, तालुकाप्रमुख