
सामना प्रतिनिधी। मुंबई
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. हा उन्हाचा कहर आणखी दोन दिवस असाच बरसणार असून मुंबईचे तापमान एक डिग्री सेल्सियसने वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अकोल्यात रविवारी 47 डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. या ठिकाणीही पारा आणखी चढणार असून अकोला यापूर्वीचा स्वतःचा रेकॉर्ड मोडेल असाही अंदाज आहे. दरम्यान, मुंबईसह 17 मतदारसंघांत उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मतदारांना आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे.
कशामुळे चढला पारा…
मध्य प्रदेश, गुजरात, मध्य महाराष्ट्रावर सायक्लॉनिक म्हणजेच प्रतिचक्रवाती सिस्टम तयार झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कोकण, मुंबईसह संपूर्ण राज्यात तापमान प्रचंड वाढले आहे. तर अरबी समुद्रात चक्रवाती सिस्टम तयार झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहात आहेत.
मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. परभणी, लातूर, नांदेड, नंदुरबार या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यावर अक्षरशः संचारबंदी लागू झाल्यासारखी परिस्थिती आहे. उष्माघाताचा त्रास जाणवू नये म्हणून काळजी घ्या. महिलांनी घराबाहेर पडताना चेहऱयाभोवती स्कार्फ गुंडाळावा, तर पुरुषांनीही काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
- शहर तापमान
- अकोला 47.2
- संभाजीनगर 44
- बुलढाणा 44
- बीड 45
- जळगाव 45
- अमरावती 46
- चंद्रपूर 47
- नागपूर 45































































