
सामना प्रतिनिधी। मुंबई
हवामान खात्याचा बाण शुक्रवारी अचूक लागला आणि पावसाने दिवसभर मुंबईसह राज्यभरात धुवांधार बॅटिंग केली. दुसऱया दिवशीही सकाळपासून पावसाने चांगली हजेरी लावली. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांत मुंबईत तब्बल 404 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून पुढच्या तीन दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या 48 तासांत मुंबईत चांगला पाऊस झाला. सर्वाधिक घाटकोपर येथे 300 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
मुंबईवर 50 टक्के ढगांची गर्दी
मुंबईचे आकाश 50.46 टक्के ढगांनी व्यापले असून मुंबईच्या डॉप्लर रडारवर मुंबईवरील ढगांच्या आकारमानाची नोंद झाल्याचे हिंदुस्थानच्या हवामान विभागाने म्हटले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे गेले दोन दिवस कोकण, मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.
तलावक्षेत्रात दमदार पाऊस, पाणीसाठा साडेपाच टक्क्यांवर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठय़ातही वाढ होत आहे. तळ गाठलेल्या तलावांत पाणी जमा होऊ लागल्यामुळे मुंबईवर घोंगावणारे ‘पाण्याचे संकट’ दूर होणार असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी परतीच्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांकडे पाठ फिरवल्याने मुंबईकरांना नोव्हेंबर 2018 पासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. यातच मान्सूनही लांबल्याने मुंबईकरांवर पाणीसंकट ओढावण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र पालिकेने नियोजन केल्यामुळे राखीव कोटय़ातील पाण्यातून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जात असून जुलैपर्यंत हे पाणी पुरणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यातच आता पावसाने जोर धरल्याने तलाव लवकरच भरतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसांत झालेला पाऊस (मिमी)

111 झाडे कोसळली, भिंत कोसळून 6 गाडय़ा दबल्या
शनिवारी झालेल्या जोरदार वाऱयासह झालेल्या पावसामुळे शहरात 24, पूर्व उपनगरात 19 आणि पश्चिम उपनगरात 68 ठिकाणी झाडे पडणे, फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. तर घाटकोपर पश्चिम येथे एकवीरा दर्शन सोसायटीजवळ इमारतीची संरक्षक भिंत कोसळून सहा गाडय़ा दबल्याची घटना घडली. सुदैवाने शनिवारच्या पावसात कोणतीही जीवितहानी झाल्याची घटना घडली नाही.
कुर्ला पश्चिम येथे सकीना मंजील या अतिधोकादायक घोषित केलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला, मात्र यात कोणी जखमी झाले नाही. ही इमारत संबंधित विभागाकडून पाडण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आज मुंबई शहरात 6, पूर्व उपनगरात 5, पश्चिम उपनगरात – 5 अशा शॉर्टसर्किटच्या 11 घटना घडल्या.































































