मुंबईत 32 ठिकाणी झाडे, फांद्या पडल्या; 4 ठिकाणी घर-भिंतींची पडझड

मुंबईत शनिवारी पावसाचा जोर वाढल्यामुळे दिवसभरात 32 ठिकाणी झाडे-फांद्या पडल्याच्या घटना घडल्या तर 4 ठिकाणी घर, भिंतींची पडझड झाली. मुंबईतील सखल भागांत दहा ठिकाणी पाणी साचले. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पाण्याचा निचरा करण्यात आला. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबईत रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दिवसभर 32 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. मुंंबईत 9 ठिकाणी, पूर्व उपनगरात 3 तर पश्चिम उपनगरात 20 ठिकाणी या घटना घडल्या. पालिका आणि अग्निशमन दलाच्या मदतीने झाडे, फांद्या हटवण्याचे काम सुरू आहे. मुंबईत 2 ठिकाणी तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक ठिकाणी घर, भिंती पडल्याच्या घटना घडल्या. शॉर्ट सर्किट एकूण 10 घटना घडल्या. यात मुंबईत 5, पूर्व उपनगरात 2 तर पश्चिम उपनगरात 3 घटनांचा समावेश आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

पावसामुळे हिंदमाता, वडाळ्यातील शक्कर पंचायत रोड, धारावी क्रॉस रोड, काळाचौकीतील सरदार हॉटेल, माटुंग्यातील एसआयईएस कॉलेज, भायखळा पोलीस ठाणे, चेंबूर पुलाखाली, चेंबूर रेल्वे स्थानक, अंधेरी सब वे आणि वांद्र्यातील नॅशनल कॉलेज या सखल परिसरात पाणी साचले. मात्र, पालिका कर्मचाऱ्यांनी या परिसरातील पाण्याचा निचरा केला. मुंबईत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहरात 81.91 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 82.69 मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात 88.67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

आपली प्रतिक्रिया द्या