वडाळा कोठडीतील मृत्यूचा तपास सीबीआयकडे

पोलिसांच्या छळामुळे तुरुंगात मृत्युमुखी पडलेल्या विजय सिंग याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिले. या प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे 15 दिवसाच्या आत सीबीआयकडे सुपूर्द करा असे न्यायालयाने पोलिसांना बजावले.

वडाळा येथील एका हाणामारीच्या घटनेत 27 ऑक्टोबर 2019 साली ताब्यात घेतलेल्या विजय सिंग याचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. याचे पडसाद उमटत वडाळ्यात मोठा तणाव झाला. याप्रकरणी पोलीसांनी एफआयआर दाखल करावा तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी हायकोर्टात वडील हृदय सिंग व विजयच्या पुटूंबियांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने या तपासाची प्रगती पाहता नाराजी व्यक्त करत एसआयटीला फैलावर घेतले तसेच एसआयटीला 15 दिवसांच्या आत चौकशीची कागदपत्रे आणि रेकाॅर्ड सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले.