सडेतोड निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींकडील प्रकरणे दुसऱया खंडपीठाकडे वर्ग, हायकोर्टाच्या रोस्टरमध्ये अचानक बदल

राजकीय व्यक्तींशी संबंधित तसेच इतर हायप्रोफाईल खटल्यांत सडेतोड निकाल देणाऱया मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्याकडील प्रकरणे शुक्रवारी दुसऱया खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली. न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी विविध प्रकरणांत ईडीला दणका देतानाच हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात किरीट सोमय्या यांना झटका दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी अचानक उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये बदल करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने विविध महत्त्वाच्या प्रकरणांत निर्णय दिला. त्यात आयसीआयसी बँक गैरव्यवहार प्रकरणात कोचर दाम्पत्याला जामीन, हसन मुश्रीफ यांना ईडीच्या कारवाईपासून संरक्षण देतानाच एफआयआरची प्रत किरीट सोमय्या यांच्यापर्यंत कशी पोहोचली, याबाबत न्यायालयीन चौकशीचा आदेश, बडतर्फ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळताना राष्ट्रीय तपास यंत्रणेवर कठोर शब्दांत ओढलेले ताशेरे, नरेश गोयल यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करीत ईडीला झटका असे सडेतोड निर्णय दिले होते.

z उच्च न्यायालयाचे रोस्टर शुक्रवारी अचानक बदलण्यात आले. त्यानुसार न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडील महत्त्वाची प्रकरणे न्यायमूर्ती एस. बी. शुव्रे आणि न्यायमूर्ती एम. एम. साठये यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहेत. याचवेळी न्यायमूर्ती शुव्रे यांच्या खंडपीठाकडील प्रकरणे न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडे वर्ग केली आहेत.