माटुंग्याच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेवर मनमानी कारभाराचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेत प्रशासन मनमानी कारभार करीत असून कर्मचाऱयांवर अन्याय, गैरकारभार आणि नियमबाह्य काम होत असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने केला आहे. मात्र हे सर्व आरोप इन्स्टिटय़ुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी)ने फेटाळले आहेत. आपली संस्था 2008 मध्ये मुंबई विद्यापाठापासून स्वायत्त झाली असून आता मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाचा संस्थेशी आता काहीही संबंध नसल्याचेही ‘आयसीटी’ने स्पष्ट केले आहे.

‘आसीटी’मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप मंगळवारी मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने पत्रकार परिषद घेऊन केला. गेल्या 56 वर्षांपासून मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटना ‘आसीटी’मधील कर्मचाऱयांच्या न्याय हक्कांसाठी लढत असल्याचे संघाने म्हटले आहे. मात्र संचालक डॉ. जी. डी. यादव हे कर्मचाऱयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही संघाने केला आहे. डॉ. यादव यांनी बेकायदेशीरपणे ‘कुलगुरू’ पदनामाचा वापर करून पदव्या वितरीत केल्याचा आरोपही संघाने केला आहे. अशा मनमानी कारभाराबाबत तंत्र शिक्षण संचालनालयाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही कारवाई किंवा दखल घेतली जात नसल्याचे संघाकडून सांगण्यात आले. यावेळी संघाचे सरचिटणीस रूपेश मालुसरे, उपाध्यक्ष अभय राणे, दीपक घोणे उपस्थित होते.

विद्यापीठ संघाचा ‘आयसीटी’शी कोणताही संबंध नाही

आयसीटी 1933 पासून संशोधनाचे शिक्षण देण्याचे काम करीत आहे. ही संस्था 2008 मध्ये मुंबई विद्यापीठापासून स्वायत्त झाल्याने स्वतंत्र झाली. मात्र मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने आपले कार्यालय या ठिकाणाहून जाणीवपूर्वक हटवले नसून याबाबत न्यायालयात प्रकरण असल्याचे आयसीटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. संघाचा आता ‘आसीटी’शी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. एका हंगामी कर्मचाऱयाला एम.ई. (प्लास्टिक) अभ्यासक्रमासाठी दिलेला प्रवेश हा नियमानुसार, जागा रिक्त असल्यामुळे आणि शिक्षणाची संधी देण्यासाठीच दिला असून संस्थेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे ‘आयसीटी’कडून स्पष्ट करण्यात आले.