मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’ला अखेर यूजीसीची मान्यता, 40 हजार विद्यार्थ्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन केंद्राला (आयडॉल) विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता अखेर मिळाली. यूजीसीने मान्यताप्राप्त संस्थांची दुसरी यादी आज जाहीर केली. त्यात ‘आयडॉल’चा समावेश आहे. ‘आयडॉल’च्या 15 अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असून त्या अभ्यासक्रमांचे प्रवेश लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

यूजीसीने मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’ची पाहणी करण्यासाठी तज्ञ समिती पाठवली होती. गेल्या 3 आणि 4 जून रोजी ही समिती विद्यापीठात आली होती. त्या समितीने विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांशी चर्चा करून आपला अहवाल यूजीसीला सादर केला होता. गेल्या 27 जून रोजी यूजीसीने 2019-20 या शैक्षणिक वर्षाच्या मान्यतेची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात ‘आयडॉल’चे नाव समाविष्ट नव्हते. त्यामुळे मान्यतेअभावी अनेक अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू केले गेले नव्हते.

लवकरच सुरू होणार प्रवेश

प्रवेश सुरू न झाल्याने दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंता पसरली होती. मान्यता मिळाली नाही तर प्रवेश होणार नाही अशा विचारांनी त्यांना भवितव्य अंधारमय दिसू लागले होते. विद्यार्थ्यांच्या या भावना युवा सेनेने विद्यापीठापर्यंत पोहोचवल्या होत्या आणि प्रवेश लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी केली होती. आता मान्यता मिळाल्याने बीए, बी. कॉम्, बीएस्सी आयटी, एमए इतिहास, एमए अर्थशास्त्र, एमए राज्यशास्त्र, एमए मराठी, एमए हिंदी, एमए शिक्षणशास्त्र, एम. कॉम्, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी आणि एसीए या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले.