मुंबई आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी वाढवली टीबीच्या औषधांची ताकद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

टीबी म्हणझेच क्षयरोगाच्या जीवाणूंची ताकद वाढल्याने प्रतिबंधक औषधेही कुचकामी ठरू लागली आहेत. परिणामी टीबीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपलब्ध औषधे देऊनही रुग्ण लवकर बरे होत नसल्याची उदाहरणे डॉक्टर देतात. या समस्येवर पवईच्या आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी जालीम तोडगा काढला आहे. त्यांनी संशोधन करून टीबीच्या औषधांची ताकद वाढवली आहे.

टीबीला प्रतिबंध करण्यासाठी रिफॅम्पिसिन हे औषध प्रभावी ठरले होते, पण सध्या टीबीचे जीवाणू या औषधालाही दाद देत नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. औषधे लागू न पडल्याने जगभरात टीबीने अडीच लाख बळी घेतले आहेत. दुसरीकडे रुग्णांची संख्याही वाढत आहे. केवळ 2015 या एक वर्षात टीबीच्या 4 लाख 80 हजार 800 नव्या रुग्णांची नोंद झाली. परिणामकारक औषधांच्या निर्मितीचा वेग त्या तुलनेत बराच कमी आहे.

आयआयटी मुंबईतील केमिकल इंजिनीयरिंग विभागातील प्राध्यापिका सारिका मेहरा आणि त्यांच्या टीमने यावर संशोधन केले. टीबीच्या औषधाला दाद न देणारे जीवाणू नष्ट करण्यासाठी औषधांची क्षमता वाढवण्यावर त्यांनी भर दिला. रिफॅम्पिसिन या औषधाला त्यांनी क्युमिन हायड्रोपेरॉक्साइडची जोड दिली. क्यूमिन हायड्रोपेरॉक्साइड हे टीबीच्या जीवाणूंच्या पेशींवर आणि गुणसूत्रांवर हल्ला करून त्यांना नष्ट करते.

औषधे एकत्रित दिल्याने प्रमाणही कमी लागणार
ही दोन्ही औषधे संयुक्तपणे दिल्यास रिफॅम्पिसिने पूर्वीपेक्षा 16 पट कमी लागते हेसुद्धा संशोधनात दिसून आले. टीबीच्या जीवाणूंची वाढ थांबवण्यास रिफॅम्पिसिन 32 मायक्रोग्रॅम प्रतिमिली तर क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड 380 मायक्रोग्रॅम प्रतिमिली या प्रमाणात लागते. पण संयुक्तपणे ही दोन्ही औषधे दिली गेल्यास रिफॅम्पिसिन हे यापेक्षा 16 पट कमी आणि क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड हे अर्ध्यापेक्षा कमी प्रमाणात लागते.