
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केल्याच्या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असतानाच मुंबई महानगरपालिकेनेही अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा जोर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विभागवार कंत्राटी कामगारांची भरती केली जाणार असून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबई-ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय वाहतुकीचे तीनतेरा वाजतात. शहराच्या सौंदर्याला, शिस्तीला बाधा येते. त्यामुळे प्रशासनाकडून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात येते. मात्र काही ठिकाणी फेरीवाल्यांची मुजोरी समोर येते. ठाण्यातील घटनेनंतर अंबरनाथमध्येही फेरीवाल्याने पालिकेच्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. महामुंबईतील अनेक भागांत फेरीवाल्यांची मुजोरी वाढू लागल्याच्या घटना वाढल्याचे समोर येत आहे. शिवाय, फेरीवाल्यांच्या मुजोरीची झळ सर्वसामान्यांनाही सोसावी लागते. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा वेग वाढविण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
अशी होणार कार्यवाही
के पश्चिम, अंधेरी पश्चिम विभागात अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास कमी करण्यासाठी वॉर्ड ऑफिसने कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये अतिक्रमण निर्मूलन वाहनांवर जानेवारी 2022 पर्यंत 20 कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी अशासकीय संस्था, मजूर संस्था, बेरोजगार संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
फेरीवाला धोरण वेटिंगवर
पालिकेने फेरीवाला धोरणासाठी फेरीवाल्यांकडून अर्ज मागविले होते. यात फक्त 99 हजार फेरीवाल्यांनी अर्ज केले. यात पहिल्या छाननीत केवळ सुमारे 15 हजार फेरीवाले पात्र ठरले होते. मात्र यानंतर धोरण निश्चिती समितीत नगरसेवकांच्या समावेशाची मागणी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे अजून फेरीवाला धोरण वेटिंगवरच आहे.





























































