
हिंदुस्थानचा अन् मुंबई इंडियन्सचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील कामगिरीवर समाधानी नव्हता. पहिल्या पाच सामन्यांमध्ये त्याने 7 बळी टिपले होते. पण तरीही त्याला आपल्या प्रदर्शनात सुधारणा करावयाची होती. त्याने आपले म्हणणे आमच्यासमोर व्यक्त केले. नव्या चेंडूसह त्याला गोलंदाजी करावयाची होती. तसेच यॉर्कर हे शस्त्र त्याला प्रभावीपणे अमलात आणायचे होते. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत जसप्रीत बुमराहला सलामीला गोलंदाजीस आणले. त्याने अवघ्या 20 धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या हरहुन्नरी पठ्ठय़ाने करून दाखवले, अशा शब्दांत मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉण्ड याने जसप्रीत बुमराहच्या कामगिरीचे कौतुक केले.
बचावात्मक पद्धतीने वापर करीत होतो
जसप्रीत बुमराह हा आमचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे त्याचा वापर आतापर्यंत बचावात्मक पद्धतीने करीत होतो. पॉवर प्ले संपल्यानंतर त्याला गोलंदाजीस आणले जात होते. पण त्याने गेल्या काही काळामध्ये आपला स्तर उंचावलाय. सुरुवातीला गोलंदाजी केल्यानंतर त्याचा प्रभाव जास्त पडू शकतो हे आम्हालाही समजले आहे, असे शेन बॉण्ड आवर्जून म्हणाला.
फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा व्हायला हवी – स्टीवन स्मिथ
मागील तीन लढतींमध्ये आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. जोस बटलरने सुरुवातीला आणि जोफ्रा आर्चरने नंतर छान फलंदाजी केली. पण पहिल्या काही फलंदाजांना ठसा उमटवता आलेला नाही. या अपयशामधून बाहेर यायला हवे. बेन स्टोक्सला संघाचे प्रतिनिधित्व करायला आणखी काही दिवस जातील. त्याआधी विजय मिळवणे गरजेचे आहे, असे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीवन स्मिथला वाटते.

























































