जयपूर राजस्थानचेच, मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव

19

सामना प्रतिनिधी । जयपूर

राजस्थान रॉयल्स संघाला नेतृत्वबदल ‘लकी’ ठरला. अजिंक्य रहाणेऐवजी स्टीवन स्मिथच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आणि राजस्थान रॉयल्सने जयपूर येथील घरच्या मैदानावर आयपीएलमधला तिसरा विजय मिळवला. लेगस्पिनर श्रेयस गोपालची प्रभावी फिरकी… स्टीवन स्मिथचे धडाकेबाज अर्धशतक… अन् संजू सॅमसन व रियान परागच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शनिवारी मुंबई इंडियन्सला 5 गडी व 5 चेंडू राखून हरवले. मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव ठरला.

मुंबई इंडियन्सकडून मिळालेल्या 162 धावांचा पाठलाग करणार्‍या राजस्थान रॉयल्सने 5 गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. राहुल चहरने अजिंक्य रहाणेला 12 धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. संजू सॅमसनने 35 धावा करीत राजस्थान रॉयल्ससाठी मोलाची कामगिरी बजावली, पण राहुल चहरने संजू सॅमसनसह बेन स्टोक्स (0) यांना झटपट बाद करीत यजमानांचा पाय खोलात नेला. स्टीवन स्मिथने यावेळी नेतृत्वाला साजेशी कामगिरी करताना 1 षटकार व 5 चौकारांसह नाबाद 59 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. रियान परागने 43 धावा करीत त्याला उत्तम साथ दिली.

प्रत्येक सामना फायनलसारखाच

लढत जिंकल्यानंतर सामनावीर ठरलेला स्टीवन स्मिथ म्हणाला, आम्ही यापुढील सर्व लढतीत सर्वस्व पणाला लावणार आहोत. प्रत्येक लढत फायनल समजूनच खेळू. याआधीच्या लढतीत मला मनाजोगता खेळ करता आला नाही. या लढतीत चांगली फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देता आल्याचे समाधान आहे. जोफ्रा आर्चर, रियान पराग यांनी आपली  धमक दाखवून दिलीय.

97 धावांची दमदार भागीदारी

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार स्टीवन स्मिथने तिसर्‍या षटकात श्रेयस गोपालच्या हाती चेंडू सोपवला. त्याने रोहित शर्माला 5 धावांवर झेलबाद करीत मुंबई इंडियन्सला 11 धावांवरच पहिला धक्का दिला. त्यानंतर यष्टिरक्षक क्विण्टॉन डी कॉक व सूर्यकुमार यादव या जोडीने दुसर्‍या विकेटसाठी 97 धावांची दमदार भागीदारी करताना राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. स्टुअर्ट बिन्नीने सूर्यकुमार यादवला 34 धावांवर बाद करीत जोडी फोडली.

रहाणेला काढून स्मिथची कर्णधारपदी वर्णी

राजस्थान रॉयल्सला या मोसमात आतापर्यंत ठसा उमटवता आलेला नाही. याचे पडसाद संघावर उमटताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत संघ व्यवस्थापनाकडून अजिंक्य रहाणेला काढून स्टीवन स्मिथकडे नेतृत्व सोपवण्यात आले. यावर त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली गेल्या मोसमात संघाने जबरदस्त कामगिरी केली. यापुढेही तो संघाचा अविभाज्य घटक राहणार आहे, पण पुढील लढतींसाठी संघामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी स्टीवन स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दरम्यान, बॉल टॅम्परिंगनंतर पहिल्यांदाच स्टीवन स्मिथने नेतृत्वाची धुरा सांभाळली.

श्रेयसचे गोलंदाजीत दोन बळी

रोहित शर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणार्‍या लेगस्पिनर श्रेयस गोपालने त्यानंतर क्विण्टॉन डी कॉकला 65 धावांवर बेन स्टोक्सकरवी झेलबाद करीत मुंबई इंडियन्सला बॅकफूटवर नेले. क्विण्टॉन डी कॉकने 47 चेंडूंत 2 षटकार व 6 चौकारांसह 65 धावांची शानदार खेळी साकारली. त्यानंतर हार्दिक पांड्याने 23 धावांची, कायरॉन पोलार्डने 10 धावांची, बेन कटिंगने नाबाद 13 धावांची खेळी केल्यामुळे मुंबई इंडियन्सला 5 बाद 161 धावा करता आल्या. राजस्थान रॉयल्सकडून श्रेयस गोपालने 21 धावा देत 2 फलंदाज बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या