
शीना बोरा हत्येप्रकरणी गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिने सोमवारी चौथ्यांदा जामिनासाठी अर्ज दाखल केला. जो गुन्हा मी केलेलाच नाही त्यासाठी मला तुरुंगात का डांबून ठेवण्यात आले आहे, असा भावनिक सवालही यावेळी इंद्राणीने विशेष न्यायाधीश जयेंद्र चंद्रसेन जगदाळे यांना केला.
शीना बोरा हत्येप्रकरणी गेल्या 50 महिन्यांपासून इंद्राणी भायखळा येथील तुरुंगात आहे. या चार वर्षांत ती पार उद्ध्वस्त झाली आहे. मानसिकदृष्टय़ा खंगलेल्या अवस्थेत एक-एक दिवस ढकलणारी इंद्राणी न्यायालयाकडे जामिनाची भीक मागत होती. यावेळी तिने अत्यंत इमोशनल होत तिच्या पश्चात तिच्या विधी या तरुण मुलीची झालेली फरफट तसेच विदारक अवस्थेचीही न्यायालयास माहिती करून दिली.
ज्या दिवशी मला अटक झाली त्या दिवशी तिचा 18 वा वाढदिवस होता. त्या दिवसापासून तिचे शुक्लकाष्ठ सुरू झालेले आहेत. स्पेनमध्ये राहणाऱया आपल्या मुलीवर काही गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवून हल्ला केला. या गुंडांनी तिचा पासपोर्टही हिसकावून घेतला आहे. या भयानक प्रसंगाने ती प्रचंड हादरली असून त्यामुळे तिच्यावर मानसोपचार सुरू आहेत, असेही इंद्राणीने न्यायालयास सांगितले.





























































