
सामना ऑनलाईन, मुंबई
यापुढे शिवरायांच्या नावापुढे ‘महाराज’ असा उल्लेख केल्याशिवाय मुंबईतून एकही विमान उडणार नाही. शिवसेनेच्या दणक्यामुळे मुंबई विमानतळाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे झाले आहे. आजवर त्यातील ‘महाराज’ या शब्दाचा विमानतळाच्या नावात आणि उद्घोषणेत समावेश झाला नव्हता. विमानतळाचा कारभार पाहणाऱया जीव्हीके व्यवस्थापनाची ही मुजोरी आज शिवसेनेने उतरवली. शिवसैनिक थेट विमानतळावरच घुसल्याने जीव्हीकेची टरकली. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे पूर्ण नाव देण्याची प्रक्रिया आजच्या आज पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करू, असे आश्वासन जीव्हीकेने शिवसेनेला दिले.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करावे, विमानतळासमोर छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारावा, पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या शिवरायांच्या पुतळय़ाजवळ गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारावी, पुतळय़ावर मेघडंबरी उभी करावी, येथील म्युझियममध्ये शिवरायांची छायाचित्रे लावावीत, शिवकालीन वस्तू ठेवाव्यात या मागण्यांसाठी शिवसेना गेल्या चार वर्षांपासून जीव्हीकेकडे पाठपुरावा करत आहे, मात्र त्याकडे जीव्हीके डोळेझाक करत आहे. त्याची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख, आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा देत आज सकाळी ११ वाजता विमानतळावर धडक देत जीव्हीके व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यामुळे टरकलेल्या व्यवस्थापनाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे पूर्ण नाव विमानतळाला देण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत पूर्ण करून त्याची अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले. देश-विदेशातून विमानतळावर उतरणाऱया नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांचे कार्य, शौर्य कळावे म्हणून विमानतळावर ठिकठिकाणी फोटो, माहिती लावण्याची मागणी अनिल परब यांनी केली. यावेळी महिला विभाग संघटक राजुल पटेल, रजनी मेस्त्र्ााr, भारतीय कामगार सेनेचे संजय कदम यांच्यासह विभागातील सर्व उपविभागप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख, युवासेनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
विमानतळासमोर शिवरायांचा भव्य पुतळा न उभारल्यास विमानतळ बंद पाडू
युती सरकारच्या काळात विमानतळासमोर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला होता. त्यामुळे विमानतळाचे काम करताना जीव्हीकेने हा पुतळा ग्रॅण्ड मराठा हॉटेल येथे हलवला आहे. याबाबत शिवसेनेने आवाज उठवताच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विमानतळाचे काम होताच शिवरायांचा पुतळा विमानतळासमोर उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही जीव्हीकेकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे विमानतळासमोर शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत जीव्हीकेने वीस दिवसांत प्लॅनिंग न दिल्यास शिवसेना विमानतळ बंद पाडेल असा इशारा आमदार अनिल परब यांनी दिला आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छत्रपतींच्या पुतळय़ाजवळ भव्य शिल्प उभारण्याबाबत पंधरा दिवसांत डिझाईन
विमानतळानजीक पश्चिम द्रुतगती मार्गानजीक शिवरायांचा पुतळा आहे. त्या पुतळय़ावर मेघडंबरी उभारावी, गडकिल्ल्यांचे भव्य शिल्प उभारावे अशी मागणी शिवसेनेने वेळोवेळी केली आहे, मात्र त्यानंतरही दिरंगाई होत असल्याने शिवसेनेने जीव्हीकेला धारेवर धरले. त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या पुतळय़ाजवळ गडकिल्ल्यांचे भव्य शिल्प उभारणे, मेघडंबरी उभारण्याबाबत येत्या पंधरा दिवसांत डिझाईन तयार करून काम सुरू करू असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.



























































