तिसऱ्या लाटेसाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये 20 हजार बेड! चार प्रमुख हॉस्पिटल्ससह 16 उपनगरीय रुग्णालये, नर्सिंग होम सज्ज

ऑगस्टनंतर कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा आरोग्यतज्ञांकडून देण्यात आल्यामुळे पालिकेने आतापासूनच आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दहिसर, मालाड, नेस्को, वरळी एनएससीआय डोम, रिचर्डसन अॅण्ड क्रुडास, भायखळा आणि मुलुंड अशा जम्बो सेंटरमध्ये 20 हजार बेडचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्स, कांजूरमार्ग आणि सोमय्या मैदान येथेही 20 दिवसांच्या आत जम्बो सेंटर उभारून कार्यान्वित करता येईल. शिवाय केईएम,  शीव, नायर आणि कूपर अशा मोठय़ा प्रमुख रुग्णालयांसह कस्तुरबासह 16 उपनगरीय रुग्णालये आणि नर्सिंग होममध्येही बेडची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजना आणि  राज्य सरकारने घातलेल्या कठोर निर्बंधांमुळे सद्यस्थितीत मुंबईत कोरोनाची दुसरी लाटही चांगलीच आटोक्यात आली आहे. मुंबईचा रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी 1063 दिवसांपार गेला असून रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीनेही 97 टक्क्यांचा आकडा पार केला आहे. तरीदेखील आरोग्यतज्ञांकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविण्यात आल्यामुळे पालिकेने जम्बो कोविड सेंटरचे नियोजन केले आहे. याशिवाय खासगी रुग्णालये, नर्सिंग होममध्येही बेडची व्यवस्था गरजेनुसार करता येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

सोमय्या मैदानात 1200 बेडचे कोविड सेंटर

सोमय्या मैदान येथे 1200 बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांनी या जम्बो सेंटरसाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र देऊन पाठपुरावा केला आहे. या सेंटरमुळे चेंबूर, माहुल, ट्रॉम्बे, देवनार, गोवंडी, कुर्ला, चुनाभट्टी, शीव भागातील रुग्णांना फायदा होणार आहे.

लहान मुलांसाठी

1500 बेड

जम्बो सेंटर्समध्ये 70 टक्के ऑक्सिजन बेड, 10 ते 15 टक्के आयसीयू बेड उपलब्ध असतील. शिवाय जुन्या आणि नव्या सर्व जम्बो सेंटर्समध्ये पेडियाट्रिक वॉर्ड असेल. लहान मुलांसाठी एकूण 1500 बेड असतील.

नेस्को 150, तर रिचर्डसन अॅण्ड क्रुडासमध्ये केवळ 10 रुग्ण

  • सद्यस्थितीत रुग्णसंख्या घटल्याने दहिसर, बीकेसी, मुलुंड ही जम्बो सेंटर्स बंद आहेत. तर 3700 बेड संख्या असलेल्या गोरेगावच्या ‘नेस्को’ कोविड सेंटरमध्ये केवळ 150 तर एक हजार बेड असलेल्या भायखळ्याच्या रिचर्डसन अॅण्ड क्रुडास सेंटरमध्ये केवळ 10 रुग्ण आहेत.
  • बीकेसी सेंटरमध्ये 2300 बेड, रिलायन्सकडून चालवल्या जाणाऱ्या वरळीच्या एनएससीआय डोम सेंटरमध्ये 500 बेड उपलब्ध आहेत. सेव्हन हिल्स 1850 बेडपैकी सध्या 700 बेडवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • सेव्हन हिल्समध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे 60 टक्के रुग्ण मुंबईबाहेरील आहेत. पालिकेच्या नियोजनानुसार महालक्ष्मी रेसकोर्स येथे 500 बेडचे सेंटर 15 ऑगस्टपर्यंत सुरू होणार असून कांजूरमार्ग सेंटरमध्ये 900 बेड उपलब्ध होतील.

आपली प्रतिक्रिया द्या