
मुंबईकरांसाठी आनंदवार्ता आहे. पुढच्या 24 तासांत मुंबई गारेगार होणार आहे. कारण मुंबईसह कोकणात रायगड, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांसाठी हवामान अंशतः ढगाळ राहणार असून कमाल तापमानातही एक ते दोन डिग्री सेल्सियसने घट होईल. मुंबईचे कमाल तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सियस राहील असे कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले.
महाराष्ट्रात मान्सून 10 जूनपर्यंत
मान्सून 31 मेपर्यंत केरळात, 10 जूनपर्यंत मुंबईसह कोकणात तर 15 जूनपर्यंत कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भात हातपाय पसरेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
परभणीत पारा 46 वर
परभणीत सर्वाधिक 46 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली तर जळगाव, अमरावती, चंद्रपूर, नांदेड, वाशीम येथे 45 अंश सेल्सियस सेल्सियस तापमान नोंदवले गेले. अनेक भागात आजही 40 हून अधिक तापमानाची नोंद झाली.
दरवर्षीप्रमाणे राज्य सरकारकडून पावसाळय़ात मासेमारीवर 1 जूनपासून बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कुलाबा येथील बधवार पार्क येथे कोळी बांधवानी आपल्या बोटी व्रेनच्या सहाय्याने जेटीवर चढवायला सुरुवात केली आहे. बधवार पार्कमध्ये अंदाजे साडेतीनशे बोटी आहेत. सर्व बोटी हळूहळू किनाऱयावर घेण्याचे काम सुरू आहे.
पर्यटकांसाठी कोकणचे किनारे बंद!
पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मालवणच्या बंदर विभागाने समुद्र किनाऱयावर पर्यटकांना 31 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे. या सागरी पर्यटनबंदीचा कालावधी रविवार 26 मेपासून सुरू झाला असून तो 31 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. अर्थात तीन महिने हे पर्यटन बंद राहणार आहे. यासंदर्भात बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक आणि सागरी पर्यटन व्यवसाय बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी 26 मे रोजी सिंधुदुर्गातील देवगड, मालवण व वेंगुर्ले येथे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, बंदर विभागाच्या मनाई आदेशानंतर त्यांच्या आनंदावर विरजण पडले. मालवणमध्ये गतवर्षी सप्टेंबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाला होता. दिवाळी तसेच नाताळ व थर्टी फर्स्टच्या निमित्ताने तिथे पर्यटकांनी गर्दी होती. त्यानंतर प्रमुख पर्यटन हंगाम असलेल्या एप्रिल ते मे पंधरावडा या कालावधीत लोकसभा निवडणुका तसेच अन्य काही कारणांनी असेल पण पर्यटकांची संख्या मालवणात रोडावली होती. मात्र, मे पंधरावडय़ानंतर काहीसे पर्यटक वाढले. गेल्या दहा-बारा दिवसांत पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली.

























































